माय मराठीचा समृद्ध वारसा !

मराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. यासोबत सत्तर वर्षानंतर दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. यानिमित्ताने आपल्या माय मराठीचा समृद्ध वारसा अधोरेखित करणारा हा विशेष लेख…

“मराठिया बोले अवघे संत।

येरि अवांतर भाष्य न लागे।”

– संत नामदेव

संत नामदेवांनी आपल्या लेखनातून मराठी भाषेची महत्ती सांगितली आहे. मराठी भाषा ही भारतातील प्रमुख भाषांपैकी एक असून तिचा इतिहास समृद्ध, साहित्यिक वारसा आणि तिला सांस्कृतिक महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणी केली जात होती. अभिजात भाषेसाठी आवश्यक असलेल्या निकषांमध्ये त्या भाषेचा प्राचीन इतिहास, स्वतंत्र परंपरा, समृद्ध साहित्य आणि समाजावर झालेला परिणाम हे महत्त्वाचे घटक असतात. संस्कृत, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना आधीच अभिजात दर्जा मिळाला होता. मराठी भाषाही सुमारे दोन हजारवर्षांहून जुनी असून संत साहित्य, लोककथा, काव्य, नाटक आणि आधुनिक साहित्य यामुळे तिचा वारसा अधिक उजळलेला आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव यांसारख्या संतकवींनी मराठी भाषेत अमूल्य योगदान दिले आहे. मराठेशाहीच्या काळात ही भाषा प्रशासन आणि लष्करी व्यवहारात वापरण्यात आली. अशा या समृद्ध भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

मराठी भाषा ही भारतातील एक समृद्ध आणि ऐतिहासिक भाषा आहे. महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा असलेली मराठी कोट्यवधी लोकांची मातृभाषा असून ती आपल्या अद्वितीय वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहे. ही भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे. इ.स. ९ व्या शतकाच्या सुमारास अपभ्रंश रूपातून मराठीचा विकास झाला. मराठी भाषा संत साहित्यातून अधिक लोकप्रिय झाली. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून, संत तुकारामांनी अभंगातून, तर संत रामदासांनी आपल्या काव्यरचनांमधून मराठी भाषेला एक वेगळी उंची दिली.

“मराठीचिया नगरी, ब्रम्ह वेचातो विकीरी।”

– संत ज्ञानेश्वर

छत्रपती शिवाजी महाराजांनीही मराठीचा गौरव वाढवला. त्यांनी राज्यकारभारासाठी मराठी भाषेचा उपयोग केला आणि राजपत्रांसाठी मराठी भाषा प्रचलनात आणली. त्यामुळे मराठी ही केवळ बोलीभाषा न राहता राजभाषा बनली. मराठी भाषेत प्राचीन काळापासून अनेक थोर साहित्यिकांनी विपुल लेखन केले आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांसारख्या संतांनी भक्तिरसपूर्ण साहित्य निर्माण केले. नंतर कुसुमाग्रज, वि.स. खांडेकर, पु.ल. देशपांडे, शिवाजी सावंत यांसारख्या साहित्यिकांनी आधुनिक मराठी साहित्य समृद्ध केले.

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मराठीच्या वेगवेगळ्या बोली आढळतात. जसे- कोकणात मालवणी, विदर्भात वऱ्हाडी, उत्तर महाराष्ट्रात अहिराणी, पश्चिम महाराष्ट्रात देशस्थ मराठी, खानदेशात खंडेशी अशी काही प्रमुख उदाहरणे असली, तरी बारा मैलावर भाषा बदलते, असे म्हटले जाते. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील बोलीमध्ये काही प्रमाणात वैविध्यता दिसून येते.  मराठी नाटक, चित्रपट, लोककला यांमध्ये भाषा महत्त्वाची भूमिका बजावते. तमाशा, भारुड, गोंधळ, लावणी यांसारख्या लोककला मराठीतूनच विकसित झाल्या आहेत. आजच्या आधुनिक काळात मराठीतून अनेक विज्ञानविषयक पुस्तके लिहिली जात आहेत. तसेच इंटरनेट, सोशल मीडिया, ब्लॉग्स यामुळे मराठीचा प्रसार वेगाने होत आहे.

अभिजात दर्जा

केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने आता तिच्या संवर्धनासाठी विशेष निधी मिळेल, संशोधनाला चालना मिळेल आणि जागतिक स्तरावर तिची ओळख अधिक दृढ होईल. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमान बाळगून तिचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार करायला हवा. अभिजात दर्जा ही केवळ मान्यता नसून मराठीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.

आजच्या डिजिटल युगातही मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही भाषा सतत विकसित होत आहे. मोबाईल अॅप्स, वेबसाईट्स, शिक्षणपद्धतीत मराठीचा समावेश वाढला आहे. शैक्षणिक आणि प्रशासकीय स्तरावर मराठी भाषेला महत्त्व देणे आवश्यक आहे. मराठी माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करता येते. मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येक मराठी भाषिकाने पुढाकार घ्यायला हवा. मराठी साहित्य वाचावे, मराठीतून लेखन करावे, मराठीत संवाद साधावा आणि मुलांना मराठी शिकवावी. आपण  मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. तिच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगून आपण मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहायला हवे.

जय मराठी! जय महाराष्ट्र! जय भारत !

– संगीता पवार

महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका,

जि.प.प्रा.शा.साई, ता. जि. लातूर