शिवव्याख्यानांच्या आयोजनातून राजधानीत शिवजयंती उत्साहात

नवी दिल्ली 20 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथे भव्य आणि ऐतिहासिक शिवजयंती सोहळा उत्साहात झाला. या सोहळ्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि व्याख्याते विशाल गरड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत तरुणाईला प्रेरणादायी संदेश दिला.

ओल्ड राजेंद्र नगर येथील बढा बाजार रोड येथे काल सायंकाळी उशिरा पार पडलेल्या या सोहळ्याचे आयोजन सरहद, पुणे, जाणता राजे प्रतिष्ठान (दिल्ली) आणि शौर्य स्मारक ट्रस्ट (पानिपत) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने सोहळ्याची सुरुवात झाली.

या कार्यक्रमास खासदार डॉ. अमोल कोल्हे प्रमुख पाहुणे होते. आपल्या भाषणात ते म्हणाले की, शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते सीमित नसून संपूर्ण भारतभूमीचे रक्षण करणारे थोर योद्धा होते. शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आली. नव्या पिढीने त्यांचा आदर्श घेणे ही काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नाहीत, तर ते एक विचारधारा आहेत. त्यांच्या नेतृत्वाचा आदर्श घेतल्यास देश अधिक सक्षम होईल.”

श्री. गरड यांनी शिवचरित्र या विषयावर प्रभावी व्याख्यान देऊन शिवरायांच्या युद्धनीती, प्रशासन कौशल्य आणि लोककल्याणकारी निर्णयांवर सखोल प्रकाश टाकला. ते म्हणाले, शिवजयंती हा केवळ सण नाही, तर मराठ्यांच्या पराक्रमाची गौरवशाली आठवण आहे. अशा कार्यक्रमांमुळे नव्या पिढीला शिवचरित्राची महती समजेल. दिल्लीसारख्या ठिकाणीही छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या विचारांचा प्रसार फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर तो राष्ट्रीय स्तरावरही प्रभावी ठरला आहे.

माजी राजदूत आणि साहित्यिक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी संभाजी महाराजांचा आदर्श घेत महाराष्ट्र देशाला कसे योगदान देऊ शकतो, यावर भाष्य केले. ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा मंत्र दिला, तर शाहू महाराज, महात्मा फुले, आगरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज परिवर्तनासाठी मोलाचे योगदान दिले आहे.”

या सोहळ्यातील मुख्य आकर्षण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या सिंहगर्जना ढोलताशा पथकाच्या दमदार सादरीकरणाचे होते. त्यांच्या वादनाने संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सहसंयोजक लेशपाल जवळगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. “जय भवानी, जय शिवाजी”च्या गगनभेदी घोषणांनी आणि ढोल-ताशांच्या निनादात या भव्य सोहळ्याची सांगता झाली.

000