नवी दिल्ली येथे दि. २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत अखिल भारतीय साहित्य संमेलन होत असून सांगलीच्या प्रा. डॉ. तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्ष असल्याने सांगलीकरांना याचा वेगळाच आनंद आहे. यानिमित्त त्यांची घेतलेली मुलाखत—-
दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. दि. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत नवी दिल्ली येथे हे संमेलन होणार आहे. प्रा. डॉ. तारा भवाळकर हे नाव मराठी साहित्य लोक साहित्य आणि रंगभूमीच्या अभ्यासात प्रसिद्ध आहे. ताराबाई सुरुवातीपासून शिक्षिका आहेत तशाच लोकशिक्षिका म्हणूनसुद्धा त्यांची ख्याती आहे. त्यांच्या व्याख्यानात नेहमीच प्रबोधनाची दिशा आणि नवी माहिती असते. या निमित्त डॉ. भवाळकर यांच्याशी साधलेला संवाद…
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आपण अध्यक्ष आहात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना मराठी साहित्य व मराठी साहित्य संमेलनाबद्दल आपल्याला काय वाटते?
साहित्यिकदृष्ट्या ग्रामीण भागातील सामान्य माणूस जागा होत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नवीन माणसं लिहायला लागली आहेत. ज्यांच्या घरात पूर्वी लेखन, वाचन नव्हते, अशी मुलं, मुली लिहायला लागली आहेत. ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते सर्वजण अभिव्यक्त होताना दिसतात. व्हॉट्सअप, फेसबुकसारख्या आधुनिक साधनांच्या माध्यमातून लेखक, कवी अभिव्यक्त होत असतात. त्यांची साहित्य संमेलने छोट्या स्वरूपात का होईना, पण होत असतात. वेळेच्या मर्यादेमुळे राष्ट्रीय स्तरावरील साहित्य संमेलनात साहित्यिकांना कमी वाव मिळणे स्वाभाविक आहे. अशा वेळी माझ्या सांगलीसारख्या छोट्या जिल्ह्यामध्ये वर्षाला दहा ते पंधरा संमेलने होतात. त्यामुळे मराठी साहित्याचा मंच अनेक लोकांना उपलब्ध होत आहे आणि स्थानिक लोकांना त्याचा लाभ मिळत आहे. लिहिणाऱ्यांना त्यातून प्रोत्साहन मिळत असते आणि त्यातूनच लेखक पुढे येत असतात. लोकल टू ग्लोबल म्हणजेच स्थानिक ते जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठीच्या प्रवासाची ही सुरवात आहे, असे माझे निरीक्षण आहे.
अभिजीत भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेला नवीन ऊर्जा मिळाली का?
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून शासकीय मान्यता मिळाल्यानंतर एक मराठी व्यक्ती म्हणून समाधान वाटले. केवळ सरकारी शिक्कामोर्तब झाले म्हणून भाषेचा दर्जा एकदम वाढत नाही. त्यातून आर्थिक फायदे मिळण्याची शक्यता आहे. शासनाकडून मराठी भाषक, संस्था, विद्यापीठ, नवलेखक आणि संशोधकांना आर्थिक सहाय्य होऊ शकेल. त्यातून प्रकाशन संस्था निघू शकतील आणि त्या निघाव्यात, त्यासाठी मराठी जाणकार भाषकांनी अधिक प्रयत्न करायला हवेत. केवळ अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून स्वस्थ बसून चालणार नाही तर तो वाढवणं आणि टिकवणं हे मराठी भाषकांच्या हातात आहे. एकीकडे मराठी भाषेचा अभिमान बाळगत असतानाच त्या अभिमानाच्या अंमलबजावणीसाठी मराठी भाषक, मराठी माणसे काय करतात, याचे आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी मराठी लोकांना तिच्याबद्दल आपुलकी असणे गरजेचे आहे. मराठी भाषक आणि मराठी लोकांनी त्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.
अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी भाषा आता ज्ञानभाषा कशी करता येईल?
यासाठी सर्व समाजानेच प्रयत्न करायला हवेत. शिक्षण संस्थांनीसुद्धा त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मुख्य म्हणजे मराठी बोलणाऱ्यांनी प्रयत्न करायला हवेत. मराठीचा अभिमान बाळगायला हवा. मनातील स्वभाषेविषयीच्या न्यूनगंडातून सर्वप्रथम बाहेर यायला पाहिजे. त्यानंतरच ती ज्ञानभाषा करण्यासाठी प्रयत्न होतील. ज्ञान याचा अर्थ नव्याने एखाद्या गोष्टीचे भान येणे आणि ते आपल्या भाषेतून व्यक्त करणे. हिंदी किंवा इंग्रजीमधून सांगितले की जगाच्या पाठीवर ते पसरेल, असा समज आहे. ज्ञान तुमच्याजवळ असेल तर ते घेण्यासाठी तुमची भाषा आपणहून शिकण्यासाठी इतर ठिकाणहून लोक यायला पाहिजेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जपान, जर्मनी सारख्या अन्य देशांची उदाहरणे पाहता त्यांच्याकडील अद्ययावत तंत्रज्ञान, यंत्रज्ञान त्यांनी त्यांच्या भाषेतच उपलब्ध करून दिले. त्यामुळे ते तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी आधी त्यांची भाषा अवगत करणे अपरिहार्य असते. त्याचप्रमाणे मराठीमध्येही तसे ज्ञान, तंत्रज्ञान, यंत्रज्ञान, अभियांत्रिकी, तत्त्वज्ञान, वैद्यकशास्त्र असेल तर मराठी भाषा अन्य लोक स्वतःहून शिकतील. त्या दर्जाचे संशोधन, लेखन करणारी मराठीतील शहाणी आणि आत्माभिमानी माणसं निर्माण व्हायला पाहिजेत.
भाषा आणि लिपी यांच्यातील अनुबंधाकडे आपण कसे पाहता?
भाषा आणि लिपी यांच्यात अनुबंध आहे, तो शिक्षितांनाही माहिती नसतो. मी तंजावरला व्यंकोजीराजे भोसलेराजे यांनी केलेल्या कार्याचा आणि साहित्य संग्रहाचा अभ्यास केला. त्याठिकाणी अनेक नाटकांची हस्तलिखिते सापडली आहेत. त्यातील गंमत अशी की त्या नाटकांची भाषा मराठी पण लिपी तमिळ, तेलगु किंवा कन्नड आहे. भाषा कन्नड पण लिपी देवनागरी आहे. गुजराती लोकसंस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या माझ्या परिचयातील एका व्यक्तिने गुजराती भाषेत पुस्तक लिहिले आहे, पण ते देवनागरी लिपीत छापले. त्याचा परिणाम असा झाला ज्यांना गुजराती येत नाही, पण देवनागरी येते त्यांनी ते वाचले तर त्यांना त्यातील 70 ते 80 टक्के आशय सहज समजतो. गोव्यामध्ये कोकणी तसेच मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये लिहिणारे, वाचणारे, काम करणारे आहेत. त्यातील एक लेखिका कोकणी भाषेत लिहिते, मात्र ती लेखनासाठी देवनागरी लिपी वापरते. त्यामुळे तिने लिहिलेलं साहित्य आपल्याला 80 ते 90 टक्के समजते. त्या भाषांमध्ये उच्चारांचा थोडासा फरक वगळला तर बऱ्याच गोष्टी समान असतात आणि लिपीमुळे आपल्याला त्या उलघडतात.
भाषा किंवा कोणत्याही भाषेतील साहित्याच्या वाढीला राज्यांच्या सीमांची बंधने आहेत, असे वाटते का?
माझ्या मते कोणत्याही सीमाप्रदेशातील सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये सीमा नाहीत. असल्या तर त्या फार पुसट आहेत. भौगोलिक सीमा प्रदेशांमध्ये राहणारी मंडळी उभयभाषक आहेत. आपण एकीकडे बहुभाषक असतो किंवा शाळांमध्येही जागतिक भाषा शिकण्यासाठी आग्रही राहतो. त्यामुळे आपल्या लगतच्या राज्यातील भाषांचे, भाषाभगिनींचे शिक्षणही या माध्यमातून अंगिकारले जाते. माझ्या मते सीमा प्रदेशातील लोक विशेषतः शाळा, महाविद्यालयात शिकणारी मुलं ही भाषेच्या समृद्धीमुळे जास्त श्रीमंत आहेत. कारण ते उभय भाषांमध्ये व्यवहार करतात. तसेच सीमाभागात मोठ्या प्रमाणावर साहित्य संमेलन होत असतात. सीमा भागांमध्ये दोन्ही भाषांमध्ये आदान प्रदान करणाऱ्या संस्था आहेत. तिथे अनुवादकांचा सत्कार केला जातो. साहित्यानं तो ऋणानुबंध टिकवून ठेवला आहे. भाषिक सीमा राजकारणामुळे दुभंगल्या असल्या तरी चाली, रीती, रूढी, लोकसंस्कृती, श्रद्धा, खाद्यपदार्थ यांचं आदानप्रदान सीमाप्रदेशात झालं आहे आणि आजही ते सुरू आहे.
मराठी भाषा संवर्धनात अन्य भाषक किंवा ब्रिटिश राज्यकर्त्यांची भूमिका कोणती होती?
आपल्याकडे जेव्हा इंग्रज प्रथम आले, त्यावेळी त्यांना आपल्या गोष्टींबद्दल उत्सुकता निर्माण झाली. संस्कृतमधील नाटकं, वेद उपनिषदे यासारखे ग्रंथ यामध्ये काय आहे, हे समजण्यासाठी इथं आलेले ब्रिटिश लोक प्रथम संस्कृत शिकले. त्यांनी संस्कृतची अक्षरशः संथा घेतली. मॅक्समुल्लरसारख्या विद्वानांना ज्ञानाची ओढ होती. युरोपमधून व्यापारासाठी लोक आले, राज्य करण्यासाठी आले. त्यांनी ज्या प्रांतामध्ये धर्म, व्यापाराचा प्रसार करायचा असेल, त्या त्या प्रांतातील भाषांचे प्रथम शिक्षण घेतले. पोर्तुगालमधील लोक गोव्यात आल्यानंतर मराठी, कोकणी भाषा शिकले. मराठीतील पहिलं व्याकरण युरोपियन माणसाने लिहिलं. विरामचिन्हं इंग्रजांनी दिली. मराठीतील पहिले पुस्तक छापलं ते कोलकात्याजवळील मिशनच्या एका छापखान्यात. हे मराठी माणसाने केलं नाही. हे भारतीय माणसानं केलं नाही. त्यांच्या हेतूसाठी का होईना इंग्रज आपली भाषा शिकले. आम्ही त्यांची भाषा शिकायला लागलो. आमच्या सांगलीसारख्या छोट्या संस्थानात इंग्रजी बुक वाचणारा कोणी आला तर त्याचे कौतुक वाटे. पण मराठी शिकणारा कोणी आला तर त्याचे फारसे कौतुक वाटले नाही. ते काम ख्रिश्चन धर्मगुरू फादर स्टिफनसनने गोव्यामध्ये केलं. मराठीचं कौतुक जसं ज्ञानेश्वरांनी केलं तसं सातासमुद्रापारहून आलेल्या फादर स्टीफनसनने मराठी भाषा शिकून मराठी भाषेची स्तुती केली.’ जैसी पुष्पामाजी पुष्प मोगरी, परिमळामाजी कस्तुरी, तैशी भाषा माझी साजरी, भाषा मराठी’ या शब्दात फादर स्टीफनसनने मराठी भाषेचं कौतुक केलं. या पार्श्वभूमिवर भारत स्वतंत्र झाल्यानंतर ७५ वर्षांनंतर आम्ही मराठी लोक काय करतो, याचं आत्मपरीक्षण करावं लागेल.
मराठी माध्यमातून शिकलेली मुलं स्पर्धेच्या सर्व क्षेत्रात कमी पडतात असे वाटते का?
अलीकडच्या काळात इंग्रजी भाषेत शिकलं तर त्याला प्रतिष्ठा. जुन्या काळात जसं संस्कृतमधून बोललं कि पांडित्य होतं, तसं सध्याचं पांडित्य इंग्रजीत आहे. अगदी ग्रामीण भागातील पालकांचाही आपल्या मुलांनी इंग्रजीत शिकावं, असा आग्रह असतो. इंग्रजीला प्रतिष्ठा आहे, हा शहरी लोकांचा अपसमज आहे आणि तो ग्रामीण भागापर्यंत रूजवला जातोय. पण, माझ्या मते मराठी माध्यमातून शिकलेली मुलं कुठेही कमी पडत नाहीत. याची अनेक यशस्वी उदाहरणे देता येतील.
मराठी भाषकांमधील हा न्यूनगंड दूर करण्यासाठी काय उपाय आहे?
वास्तविक आमच्या देशाची संस्कृती प्राचीन आहे, तत्त्वज्ञान मोठं आहे. मग आमच्या देशातील उच्चवर्णीय, उच्चशिक्षित पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना का असावी? माझा मुलगा परदेशात नाही गेला तर दुसरा मार्गच मिळणार नाही, असे त्यांना का वाटते, असा मला प्रश्न पडतो. एकीकडे आम्ही अभिजात दर्जा मिळाला म्हणतो, त्यावेळी मुंबईसारख्या महानगरात मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत, हे खेदजनक आहे. जपानसारखा दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेला देश राखेतून ताठ मानाने उभा राहिला. आमची भाषा शिकल्याशिवाय तुम्हाला आमचे तंत्रज्ञान मिळणार नाही, असे म्हणतो. तेव्हा मराठी जनांनी आपल्या मुलांना आग्रहाने मराठी शिकवलं पाहिजे आणि त्यांना प्रवृत्त केले पाहिजे कि तुम्ही संशोधन करा व मराठी भाषेमध्ये मांडा कि ते तंत्रज्ञान शिकण्यासाठी लोक तुमच्याकडे आले पाहिजेत. अशा शिक्षणासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न सर्वच स्तरातून केले गेले पाहिजेत.
लोकसाहित्यावर आपण खूप संशोधन, संकलन केले आहे. त्याबद्दल थोडेसे….?
लोकसाहित्याबद्दल म्हणाल तर काही अपसमज आहेत. लोकसाहित्य ग्रामीण असते, अशिक्षित लोकांचे असते, भूतकाळातील असते असे काही समज आहेत. खेडेगावातील महिलांनी जात्यावर दळण दळत असताना ओव्या लिहिल्या. या सर्वांशी आमचा संबंध नाही असे शहरी लोकांना वाटते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये करमणुकीचे साधन व पैसे देणारे साधन म्हणून गोंधळ, जागरण, पोवाडा, लावण्या काही अंशी टिकले आहे. कारण त्यामध्ये गीत, नृत्य, नाट्य, वाद्य आहे. त्या सगळ्याचा संगम म्हणून ते नृत्यनाट्य सादर होत आहे. मात्र त्यातील धार्मिक भावना, संस्कृतीची गुंफण होती, ते श्रद्धाविश्व गळून पडले आहे. त्यामध्ये नकळत धर्मश्रद्धेचा धागा असतो, तो क्षीण झाला आहे, त्याचे स्वरूप बदलले आहे. त्या पार्श्वभूमिवर त्यातील कलात्मक घटकांचा विकास होण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. त्याचा इथून पुढे आपण कसा वापर करणार, यावर विचार व्हायला पाहिजे.
स्त्रीवादी किंवा स्त्रियांनी लिहिलेलं साहित्य तसंच लोकसाहित्याबद्दल काय सांगाल?
एकूणच साहित्यामध्ये निरनिराळ्या क्षेत्रातील, निरनिराळ्या सामाजिक स्तरातील महिला लिहित आहेत. व्यक्त होत आहेत. आदिवासी महिला, ग्रामीण भागातील महिला लिहित आहेत. केवळ शिक्षण घेतल्यानंतर महिला शहाण्या झाल्या, हा माझ्या दृष्टीने अपसमज आहे.
लोकसाहित्यातील महिलांचा विचार करता, त्यांच्या लेखनातून महिला पहिल्यापासून खूप शहाण्या आहेत, असे मला वाटते. आमच्याकडे स्त्रियांबद्दल पुरुष काय म्हणतात त्याचा विचार झालेला आहे. मात्र महिला, घरातील स्त्री स्वतःबद्दल काय म्हणते हे कोणी नीट पाहिलं नाही. तथाकथित स्त्रीमुक्ती वादी महिला म्हणते त्याच्यापेक्षा जात्यावर दळण दळणारी बाई जास्त क्रांतिकारी बोललेली आहे हे मी सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. ती बोलून दाखवत होती फक्त ते ऐकायला कोणी नव्हतं. बहिणाबाईंनी अशिक्षित असूनही अनेक शब्दांच्या व्युत्पत्ती सांगितल्या. संत स्रिया आधुनिक कवियित्रींच्या खूप पुढे होत्या.
वाचनसंस्कृती वाढण्यासाठी काय करायला पाहिजे?
पुस्तकांचे ढीग आणून टाकले म्हणजे वाचन संस्कृती वाढत नाही. माणसांना आतून वाटल्याशिवाय, पोटातून वाटल्याशिवाय ते ओठात येणार नाही. माणसांना ज्ञान संपादनाची निकड वाटली पाहिजे आणि ते ज्ञान संपादन ज्या मार्गाने होत असेल त्या मार्गाने केले पाहिजे. ऐकून, वाचून किंवा अन्य भाषा शिकून ज्ञानसंपादन केले पाहिजे. मला नवीन काहीतरी शिकायचं आहे आणि मी ते वाचनातून संपादन करेन असे माणसाला वाटले पाहिजे. कविता, कथा किंवा कादंबरी असे सर्व साहित्यप्रकार शिकवतात. आपल्याला फक्त ते नीट वाचता आलं पाहिजे.
साहित्य क्षेत्रात नव्या पिढीकडून आपल्या काय अपेक्षा आहेत?
ग्रामीण भागातील मुलं, मुली नव्याने लिहायला लागली आहेत. पुस्तकं मोठ्या संख्येने प्रकाशित होत आहेत. छोट्या छोट्या गावांमध्ये प्रकाशक पुढे येत आहेत. सुदैवाने काही जणांना स्वखर्चाने पुस्तक प्रकाशित करण्याची आता ऐपत निर्माण झाली आहे. एकूणच खर्च करण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. साहित्याच्या दृष्टीने पुस्तके विकत घ्यावीत, स्वखर्चाने पुस्तके प्रकाशित करावीत असे नव साहित्यिकांना तसेच लोकांना वाटते आहे. यातून पुस्तकाबद्दलची आस्थाच प्रगट होत आहे. ही गोष्ट माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
(शब्दांकन – संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली)
प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ग्रंथसंपदा
राणीसाहेब रूसल्या (एकांकिका), मधुशाला (बच्चनकृत काव्य अनुवाद), यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा आ. 1, यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा आ. 2, प्रियतमा (गडकरी साहित्यातील स्त्री प्रतिमा), लोकनागर रंगभूमी, महामाया (डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या सहयोगाने), मिथक आणि नाटक, लोकसंचित, लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमा, स्त्री मुक्तीचा आत्मस्वर, माझिये जातीच्या, मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद, आचार्य जावडेकर : पत्रे आणि संस्मरणे, लोकसाहित्य, वाडमय प्रवाह, कुमारभारती, बारावी संपादन, मराठी लोकसाहित्य एम.ए. भाग 1 व 2 साठी, मराठी नाटक : नव्या दिशा नवी वळणे, मायवाटेचा मागोवा (स्त्रीवादी दृष्टिकोनातून लोकसाहित्याचे पुनराकलन), तिसऱ्या बिंदूच्या शोधात, लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिभा, बोरीबाभळी (रा. रं. बोराडे यांच्या ग्रामीण स्त्री विषयक कथांचे संपादन आणि प्रस्तावना, पायवाटेची रंगरूपे (आत्मकथनपर लेखसंग्रह) आकलन आणि आस्वाद, लोकसंस्कृतीची शोधयात्रा (डॉ. रा. चिं. ढेरे व्यक्ती आणि वाड्मय), माझिये जातीच्या (दुसरी आवृत्ती), लोकांगण (लोकसंस्कृती विषयक), लोकसाहित्याच्या अभ्यास दिशा, मनातले जनात (ललित लेखसंग्रह), निरगाठ सुरगाठ (ललित लेखसंग्रह), मातीची रूपे (लोकसंस्कृती विषयक), मरणात खरोखर जग जगते (कथा संग्रह), नाट्याचार्य खाडिलकर चरित्र, स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर (दुसरी आवृत्ती), स्नेहरंग (साहित्यातील व्यक्तीचित्रे), लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा, प्रातिभ संवाद : संपादन मुकुंद कुळे, मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद, सीतायन, कथा जुनी तरी नवी, मुक्तिमार्गाच्या प्रवासिनी.
00000