नागपूर, दि. २०- वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत सावनेर तालुक्यातील कोटोडी परिसरात जमीन संपादित केल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न तत्काळ मार्गी लागावा यादृष्टीने एक सर्वंकष समिती नेमण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
सावनेर तालुक्यातील कोटोडी येथे पुनर्वसन व इतर मागण्यांना घेऊन उपोषणास बसलेल्या गावकऱ्यांची महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रत्यक्ष जाऊन भेट घेत चर्चा केली. आपल्या सर्व मागण्याबाबत नव्याने निर्माण केली जाणारी समिती सर्व बाबी पडताळून आपला अहवाल एक महिन्याच्या आत सादर करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
वेस्टन कोलफिल्ड कडुन जमीन संपादन करतांना काही सर्वे क्रमांक अर्थात जमीनीचे तुकडे कायद्याच्या चौकटीत पाडण्यात आले का याचीही समिती माहिती घेऊन प्रत्यक्ष चौकशी करेल. ज्याचे प्लाट सुटलेले आहेत त्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने समिती वेकोलीच्या मुख्यालयाला सविस्तर अहवाल पाठवून याबाबत कायद्यानुसार कार्यवाही करेल, असे या चर्चेत निश्चित करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. आमदार डॉ. आशिष देशमुख, वेकोलीचे सी.एम.डी द्विवेदी, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी मस्के, तहसीलदार रवींद्र होळी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक धोटे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
00000