मराठी भाषेचा वापर वाढवावा…

भाषा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. भाषेशिवाय आपल्याला जगताच येणार नाही. मग ती भाषा शब्दांची,  डोळ्यांची, किंवा हावभावांची असो. तिच्याद्वारेच आपण आपल्या भावना, विचार व्यक्त करत असतो. या भाषेत मातृभाषेला जास्त महत्त्व आहे. भाषा माणसाने निर्माण केली. तिला चिन्ह, त्याला अर्थ माणसांनी दिले .त्यामुळे हजारो भाषा निर्माण झाल्या. त्यातील एक भाषा म्हणजे आपली मराठी. तिला 2000 वर्षाचा इतिहास आहे. तिच्यातील शिलालेख, ताम्रपट,  लिखित साहित्य आजही उपलब्ध आहे. संत ज्ञानेश्वरांनी तिची तुलना अमृताची करून तिला अमृतापेक्षा सरस आणि मधुर ठरवलेले आहे आणि त्यामुळेच या भाषेचं वेगळेपण आपण लक्षात घेतलं पाहिजे. भाषा आपल्याला आईसारखीच असते. मराठी इतक्या समृद्ध भाषा फार कमी आहेत. मराठीचे वेगळेपण अनेक प्रकारे सिद्ध करता येते.

मराठीत सुमारे 48 काव्यप्रकार आहेत. ज्या भाषेत आपल्या सगळ्या भावना विचार नेमकेपणाने व्यक्त करता येतात ती भाषा समृद्ध मानली जाते. मराठी अशी समृद्ध भाषा आहे. अगदी एखाद्या क्रियापदाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला तर त्याचा अर्थ बदलत जातो उदाहरणार्थ भरणे.. या क्रियापदाचा वापर जसा तुम्ही कराल तसा त्याचा अर्थ बदलत जातो. नळाचे पाणी भरणे,  मनात एखादी व्यक्ती भरणे, कान भरणे, लक्ष्मी पाणी भरणे, जखम भरणे, अंगाने भरणे, वगैरे वगैरे.. प्रत्येक भरण्याचा अर्थ वेगळा अर्थछटा वेगळ्या. मराठी भाषेला काना, मात्रा, वेलांटी, स्वल्पविराम ,पूर्णविराम,असे अनेक चिन्हे आहेत. यांच्या माध्यमातून ती भाषा अधिक अर्थपूर्ण, सुंदर दिसते. मराठी भाषा संपन्न व समृद्ध आहे पण ‌दुर्दैवाने आज मातृभाषेपेक्षा इंग्रजी भाषा महत्त्वाची ठरत आहे.

इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्यामुळे आपण मुलांचे किती नुकसान करत आहोत हे आज आपल्या लक्षात येणार नाही. एक तरी भाषा परिपूर्णरित्या आली तर दुसऱ्या भाषा पटकन शिकता येतात. अलीकडे मुलांचे एकाही भाषेवर प्रभुत्व नसते. त्यामुळे त्यांना आपल्या भावना, विचार व्यक्त करताना नेमके शब्द सापडत नाहीत. हा अनुभव आहे. इंग्रजीमध्ये बोलले म्हणजे आपल्याला कोणीतरी मोठे असल्यासारखे वाटते. पण भाषा ही ऐकून येत असते. घरात वेगळी भाषा, शाळेत वेगळी भाषा, समाजात वेगळी भाषा. असे असेल तर त्या मुलांना कोणत्याही एका भाषेत नीटपणे आपले विचार व्यक्त करता येत नाहीत. उलट आपली जी मातृभाषा असते त्यातच आपण जर शिकलो तर आपल्याला भविष्यात कुठेही अडचण येत नाही. इंग्रजी भाषा फक्त अगदी उच्च पदावर असणाऱ्या व परदेशी जाणाऱ्या व्यक्तींनाच उपयोगी पडू शकते. उलट मातृभाषेबरोबर प्रादेशिक भाषा जरी शिकल्या तर त्याचा जास्त उपयोग होईल. आपले म्हणणे जर योग्य रीतीने मांडता आले नाही तर त्या व्यक्तीची घुसमट होते. अशा मुली, मुले आत्मकेंद्री व एकलकोंडी होतात. ते चार लोकांत मिसळू शकत नाहीत .त्याचा परिणाम त्यांच्या  करिअरवरही होतो. मराठी भाषा इंग्रजी पेक्षा निश्चितच संपन्न व समृद्ध आहे. या भाषेचं वेगळेपण अनेक बाबतीत आहे. त्यामुळे मराठीचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.

आपली मराठी भाषा आपणच टिकवली पाहिजे. त्यात आवर्जून बोलले पाहिजे. त्यातील भाषिक सौंदर्याचा लाभ घेतला पाहिजे. मराठीतील म्हणी, वाक्प्रचार अतिशय सुंदर आहेत. मराठी भाषेची विशेषणे सुद्धा खूप छान आहेत. उदा. लुसलुशीत पोळी,  खुसखुशीत करंजी,  ठणठणीत तब्येत, चटपटीत मिसळ,  गुटगुटीत बाळ, चुणचुणीत मुलगी.. असे कितीतरी विशेषणे सांगता येतील.

मराठी भाषेचा उपयोग रोजच्या व्यवहारात सुंदर रीतीने केला पाहिजे.. आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे संपन्न होत आहे आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला आहे.. मराठी अभिजात आहेच.. परंतु ती आता जगन्मान्य झाली आहे.. या भाषेतील समृद्ध साहित्य आता इतर भाषेतही अनुवादित होईल.. मराठीचे क्षेत्र विस्तारत जात आहे.. फक्त अलीकडे बोलीभाषेचा वापर कमी होऊन प्रमाण भाषेचा वापर जास्त होत आहे.. त्यामुळे बोली भाषेतील अनेक म्हणी, वाक्प्रचार काळाच्या ओघात नष्ट होत आहे. अशी भाषा बोलणारी माणसंही कमी झाली आहेत.. मोबाईलमुळे किंवा सोशल मीडियामुळे प्रमाण भाषेचा वापर होत आहे.. परंतु तोही शुद्ध स्वरूपात नाही.. कारण इंग्रजी व हिंदी भाषेचा प्रभाव येणाऱ्या पिढीवर अधिक होत आहे..

त्यामुळे मराठीचे मराठीपण टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरच आहे. यासाठी मराठीतील साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत कसे जाईल आणि मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त कसा करता येईल, याचाच विचार करण्याची गरज आहे.. माहिती जनसंपर्क कार्यालय याविषयी जनजागृती करत आहे, ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे.. प्रत्येकानेच आपली भाषा जिवंत ठेवण्यासाठी त्याच भाषेत बोलले पाहिजे. लिहिले पाहिजे आणि त्या भाषेतील साहित्य वाचले पाहिजे.. भाषेत सतत परिवर्तन होतच असते. नवीन शब्द येतच असतात. पण सगळेच नवीन न स्वीकारता काही जुने शब्द, त्यातील गोडवा ही आपण जाणीवपूर्वक जपला पाहिजे.. मराठी भाषेचा वापर वाढवला पाहिजे  तसा संकल्प आपण सगळेच करू यात..

-प्रा. डॉ. श्रुती श्री. वडगबाळकर, सोलापूर