पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला मृद व जलसंधारणाच्या कामांचा आढावा

यवतमाळ, दि.२१ (जिमाका) : जिल्ह्यात सुरु असलेल्या मृद व जलसंधारणाच्या विविध कामांचा पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतला. येत्या तीन महिन्यात जास्तीत जास्त कामे पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जलसंधारण विभागाचे अधिक्षक अभियंता श्री.निपाने, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली रसाळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी भुपेश दमाहे, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ए.आर.पांडे यांच्यासह जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी गेल्या दोन वर्षातील मंजूर कामे, प्रशासकीय मान्यता दिलेली कामे, सुरु झालेली कामे, पुर्ण झालेली कामे, सुरु असलेली व सुरुच न झालेल्या जिल्ह्यातील सर्व कामांची माहिती घेतली. तालुकानिहाय अपुर्ण कामांची माहिती घेतांना येत्या तीन महिन्यात म्हणजे पावसाळा लागण्यापुर्वी बहुतांश कामे पुर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद सिंचन विभाग, जलसंधारण महामंडळाच्या कामांचा विभागनिहाय आढावा घेतला. जलयुक्त शिवाय योजनेचा जिल्ह्याचा ४० कोटींचा आराखडा आहे. या योजनेंतर्गत ३३० कामे मंजूर असून २८९ कामांना कार्यादेश देण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या योजनेचा वाढीव आराखडा १३५ कोटी रुपयांचा करण्यात आला असून या आराखड्यास मान्यता देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. ही योजना उत्तमप्रकारे राबविणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार योजना सुरु करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त तलावातून योजनेंतर्गत गाळ काढण्याचे उद्दिष्ठ ठेवावे, असे पालकमंत्री म्हणाले. सुरुवातीस संबंधितांनी आपआपल्या कामाचे सादरीकरण केले.

000