सामाजिक दायित्व निधीतून केलेले वर्गखोल्यांच्या आधुनिकीकरणाचे कार्य कौतुकास्पद
मुंबई, दि. २१: सामाजिक दायित्व निधीतून समाजकार्य अनिवार्य केल्यापासून गेल्या दशकामध्ये शिक्षण, आरोग्य, पर्यावरण यांसह अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य झाले असून या निधीतून होत असलेले शासकीय व निमशासकीय शाळांच्या आधुनिकीकरणाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.
राज्यपालांनी आज परळ मुंबई येथील श्री तुलसी हिंदी माध्यमिक विद्यालयास भेट देऊन तेथे सामाजिक दायित्व निधीतून तयार करण्यात आलेल्या स्मार्ट वर्गखोल्यांची तसेच स्वच्छतागृहांची पाहणी केली, त्यानंतर ते बोलत होते.
स्मार्ट क्लासरूम व डिजिटल बोर्ड उपलब्ध करून देताना स्मार्ट शिक्षक असणे आवश्यक आहे असे सांगून शिक्षक परिवर्तनासाठी तयार नसल्यास आधुनिक सुविधांचा लाभ अपेक्षित प्रमाणात पोहोचणार नाही असे राज्यपालांनी सांगितले.
‘युवा अनस्टॉपेबल’ या अशासकीय संस्थेच्या पुढाकाराने शाळांच्या अद्ययावतीकरणाची देशव्यापी मोहीम राबविण्यात आली असून त्या योजनेअंतर्गत शाळेला स्मार्ट क्लासरूम व आधुनिक स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली देशात अनेक परिवर्तनकारी उपक्रम राबविण्यात येत असून ‘स्वच्छ भारत’ उपक्रमाअंतर्गत रेल्वेमध्ये बायो टॉयलेट बसविल्यामुळे देशातील रेल्वे स्थानके स्वच्छ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळांमध्ये आधुनिक स्वच्छतागृहे बसवून देताना तेथे पुरेसे पाणी उपलब्ध असल्याची खातरजमा करावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी संस्थांना केली.
यावेळी राज्यपालांनी मुलांना परस्पर संवादी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी तयार केलेल्या विज्ञान – तंत्रज्ञान प्रयोगशाळेला भेट दिली तसेच शाळेत नव्याने विकसित करण्यात आलेल्या स्वच्छता सुविधा आणि स्मार्ट वर्गखोल्यांची पाहणी केली.
या प्रसंगी युवा अनस्टॉपेबलचे संस्थापक अमिताभ शहा, एचडीएफसी बँक ‘परिवर्तन’ उपक्रमाच्या प्रमुख नुसरत पठाण, लेखक अमीश त्रिपाठी, पार्थ वसवडा (युवा अनस्टॉपेबल), कॉर्पोरेट क्षेत्रातील नेते आणि युवा अनस्टॉपेबलच्या माध्यमातून शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यपालांच्या हस्ते टाटा कॅपिटल, बँक ऑफ अमेरिका, जीएसके, नोमुरा, कॅपजेमिनी, नुवामा, एचडीएफसी बँक, बजाज इलेक्ट्रिकल्स, येस बँक, फिनोलेक्स आणि इतर संस्थांच्या प्रतिनिधींना त्यांच्या योगदानाबद्दल ‘युवा कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
०००