राजधानी नवी दिल्लीत येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. शिवाय काही महिन्यांपूर्वीच माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून या पार्श्वभूमीवर माय मराठीच्या संवर्धनामध्ये लोककला व लोकगीतांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व सांगणारा हा लेख…
महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास साधारणतः इ.स.च्या सहाव्या -सातव्या शतकापासून सुरू होतो. लोककला हा सांस्कृतिक इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. लोकसमूहांचे दैनंदिन जीवनाशी संबंधित परंतु कलात्मक आविष्कार ‘लोककला’ म्हणून ओळखले जातात. विविध भागांत आपापल्या रूढी, परंपरेनुसार व धर्मश्रद्धेनुसार लोककलांची निर्मिती झाल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. यामध्ये प्रामुख्याने नृत्य, नाट्य, संगीत, शिल्प,वास्तुकला, चित्र, कारागिरी, हस्तकला, वस्त्रालंकरण, शोभालंकार, बहुरूपी, वासुदेव,काव्य, गोंधळ, भारूड, वाघ्या-मुरळी, दशावतारी नाटके, यक्षगान, कीर्तन, पोवाडे, तमाशा, कव्वाली, लेझीम, टिपरी, जात्यावरची गाणी, भूलईची गाणी, मंगळागौर इत्यादी कलांचा अंतर्भाव लोककलांमध्ये होतो.
इ.स. १३१८ नंतर दिल्लीसह आजचा मराठवाडा परिसरही मुस्लिम सत्ताधीशांच्या अधिपत्याखाली गेला. यानंतरचा काळ कला आणि संस्कृतीच्या दृष्टीने अधिक धामधूमीचा ठरला. इ.स.१७२४ ते १९४८ साली मराठवाड्यावर हैदराबादच्या निजामाचे राज्य होते. परंतु, याकाळातही येथील विशेषतः ग्रामीण भागातील लोकांनी लोककलेच्या माध्यमातून आपली मराठी भाषा व संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केल्याचा दिसतो. यानिमित्ताने याचा मागोवा घेणे क्रमप्राप्त ठरते.
लोककलेचा विशिष्ट आविष्कार ‘कोल ‘
‘कोल’ हा आजच्या मराठवाड्यातील लातूर येथे खेळला जाणारा वैशिष्ट्यपूर्ण लोककलेचा प्रकार होय. ‘कोल’ नावाचा एक अतिशय मनोरंजक सामूहिक खेळ असून निजामी अंमलाखालील लातूरची ही सांस्कृतिक श्रीमंती मराठवाडावासीयांनी फार हौसेने जोपासली, हे विशेष! या खेळातील काही मजेशीर व मासलेवाईक गाणी …
” जग कोल कोल कोल रे,
आडाचं पाणी लई खोल…
आडाचं पाणी मला शेंदवेना,
अंबाड्याची भाजी खाववेना….
दही ताकड् घिन…. ”
अशी ही गाणी मराठी भाषेच्या सौंदर्यात भर टाकणारी ठरतात.
०००
भूलईची गाणी (फेर)
नागपंचमीच्या सणा निमित्ताने सर्व महिला भुलईचा फेर धरतात. शेकडो वर्षापासून भूलईच्या गाण्याच्या माध्यमातून आपली मराठी संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम करीत आहेत.
१)”गाडी घुंगराची माझ्या माहेराची,
घेऊनी आला भाऊराया गं. . .
आज जाणार मी माहेराला.. “
२) “आंबे खावे वहिनीला द्यावे ,
साळीमध्ये झुरुझुरु जावे तुम्ही नागोबा.. “
०००
वासुदेवाची गाणी :
मराठी संस्कृतीतील वासुदेवांची परंपरा सुमारे हजार-बाराशे वर्षे जुनी असावी असा अंदाज आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्या साहित्यात वासुदेवावरील रूपके आढळतात.
“अवो जनाबाईंच्या भक्ती –देव ,
जनामातेला काम भारी,
घालिते दळण जात्यांवरी,
विठ्ठला या हो लौकरी… “
वंश परंपरागत शेकडो वर्षापासून चालत आलेली ही लोककला व मराठी बोलीभाषा वासुदेव समाजाने आजही जिवंत ठेवली आहे.
०००
लमाण (बंजारा) लोकगीते :
लमाण समाजातील लोककलेला मायबोलीला समृद्ध करणारी ‘होळीगीते’ खालील प्रमाणे आहेत.
“भोळी सजनीं ये देद हातेम हात,
भोळी सजनी ये देद जलमेरी साथ,
भारी बेईमान रे रच छोरारी जात,
भारी बेईमान रे रच छोरारी जात।”
०००
गोंधळ (आराधी लोकगीते) :
महाराष्ट्र राज्यात गोंधळी या जमातीतील लोक गोंधळ सादर करतात. आपल्या माय मराठीचे जतन करणारी काही गाणी
“आठवण येता तुझी माय येडामाय अचानक काळजात दुखलं..
काय माझ्याकडुन चुकलं फुल गुलाबाचं सुकलं…
आठवण येता तुझी माय गं येडामाय अचानक काळजात दुखलं ||धृ||
०००
भारुड
महाराष्ट्रात सुमारे ८०० वर्षे भारूड हा काव्यप्रकार खूपच लोकप्रिय ठरला आहे. संत नामदेवांपासून मराठी भारुडे लिहिण्याची परंपरा सुरू झाली. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास यांनी ती पुढे चालवली.
” सत्वर पाव गं मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला।
सासरा माझा गावी गेला, तिकडंच खपवी त्याला – भवानी आई।”
आधुनिक काळातील भारुडे…
“कल्लुळाचं पाणी कसं गं ढवळीलं…
अन् या नागाच्या पिलाला का गं खवळीलं… “
०००
पोवाडा
पोवाडा हा यादवांच्या काळात तेराव्या शतकात उदयाला आला आणि सतराव्या शतकापर्यंत जोमात राहिला. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व पोवाड्यापैकी सर्वात जुना आणि पहिला पोवाडा ‘अज्ञानदास यांनी १६५९ साली लिहिलेला आहे. त्याचा पोवाडा शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आहे.
“डावे हाती बिचवा ल्याला ।
वाघनखं सरजाच्या पंजाला॥
वरून बारीक झगा ल्याला ।
कंबररस्ता वेढा केला ।
पोलाद घातला गळां ॥
फीरंग पट्टा जिऊ म्हाल्याप दिला । शिवाजी सरजा बंद सोडुनि चालला ॥”
माय मराठीचा जागर पोवाड्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेकडो वर्षापासून होतो आहे.
०००
गौळण
गौळण हा मराठी भाषेतील भक्तिमय गाण्याचा प्रकार आहे. गवळणीच्या माध्यमातून मराठी भाषेचे संवर्धन फार मोठ्या प्रमाणात झाले आहे.
१)”गोकुळीचा चोर याला बांधा उखळाला ॥ धृ.॥
अवचित कान्हा घरात शिरतो दही दूध तूप चोरूनी खातो धाक नाही याला बाई धाक नाही याला ॥ १ ॥
०००
लोकनाट्य (तमाशा)
१७ व्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये तमाशा हा अतिशय लोकप्रिय असणारा कलाप्रकार आहे.
१)”नाव गाव कशाला पुसता, मी तर आहे कोल्हापूरची.. मला हो म्हणत्यात लवंगी मिरची..”
२)” कुण्या गावाचं आलं पाखरू ..
बसलयं डौलात.. खुदु खुदु हसतयं गालात..”
अशा अनेक लोकगीतांच्या माध्यमातून मराठी भाषा जनमाणसांमध्ये टिकून राहिली आहे.
०००
भजन-कीर्तन
भजन व कीर्तनाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये ज्ञानोबा-तुकोबांचे अभंग गायले जातात. यामुळे ही मराठी भाषेचे संवर्धन होण्यास फार मोठी मदत झाली आहे.
“आळंदी हे गांव पुण्यभूमी ठाव ।
दैवतांचे नांव सिद्धेश्वर ॥
चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्धभेटी मेळा ।
तो सुख सोहळा काय सांगू ॥…”
गत शेकडो वर्षांपासून अशा लोककला व लोकगीतांच्या माध्यमातून माय मराठीचे संवर्धन करण्याचा महाराष्ट्रातील सामान्य लोकांनी केलेला प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे.
– विवेक सौताडेकर, साहित्यिक ,लातूर मो.९४०३१०१७५२
(संकलन : जिल्हा माहिती कार्यलय, लातूर)