राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून मुंबईत; १० मार्च रोजी अर्थसंकल्प

विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक

मुंबई, दि. २३ : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. ३ मार्च ते बुधवार दि. २६ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.

विधानभवन मुंबई येथे आज विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, शंभुराज देसाई, आमदार सर्वश्री प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, ॲड.अनिल परब, हेमंत पाटील, श्रीकांत भारतीय, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, डॉ.नितीन राऊत, रणधीर सावरकर, अमिन पटेल, विधिमंडळ सचिव (१) जितेंद्र भोळे, सचिव (२) विलास आठवले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या.

अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवार दि. ८ मार्च २०२५ रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, तर दि. १३ मार्च २०२५ रोजी होळी निमित्त कामकाजास सुटी देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.

00000