ठाणे,दि.24(जिमाका):- ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या समजून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत “जनता दरबार” ठाणे शहरातील रघुवंशी हॉल, 8, खारकर आळी रोड, जांभळी नाका, ठाणे (पश्चिम) येथे संपन्न झाला.
या जनता दरबारात 560 नागरिकांनी आपल्या समस्या वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे मांडल्या. बहुतांशी सामाजिक सद्य:स्थिती, शिक्षण, महिला संरक्षण, पाणीपुरवठा, जनजाती, वन, शेतजमीन या व अशा विविध विषयांबाबत निवेदने प्राप्त झाली आहेत. त्यापैकी काही निवेदनांबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून त्यांचे तात्काळ समाधान केले गेले. उर्वरीत तक्रारींबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी विहित नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी, असे निर्देश मंत्री महोदयांनी दिले.
यावेळी आमदार निरंजन डावखरे व संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, उमेदच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, कार्यकारी अभियंता सुनील पाटील व संदीप चव्हाण, जिल्हा कोषागार अधिकारी महेशकुमार कारंडे, जिल्हा उपनिबंधक डॉ.किशोर मांडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सोनाली देवरे यांच्यासह अन्य विविध शासकीय विभागांचे अधिकारीही उपस्थित होते.
यावेळी वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, भारताला सामर्थवान आणि विकसनशील बनविण्याच्या दृष्टीने शिक्षण, आरोग्य, पाणी, निवारा, क्रीडा, कला, विज्ञान व संरक्षण क्षेत्रातील समस्यांचे निराकरण होणे गरजेचे आहे, म्हणून हा “जनता दरबार” भरविण्यात आला. त्याचबरोबर प्रत्येक शासकीय विभागाला 100 दिवसांचा कृती आराखडा शासनाने ठरवून दिला आहे. या कृती आराखड्यामुळे महाराष्ट्र एका उंच पातळीवर नेऊन ठेवण्याचे काम या जनता दरबाराच्या माध्यमातून केले जाणार आहे. याआधी नवी मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी जनता दरबार झाले असल्याचे सांगून येत्या 28 फेब्रुवारीला नवी मुंबई येथे पुन्हा जनता दरबार होणार असल्याचेही श्री.नाईक यांनी सांगितले.
या जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच आलेल्या जनतेला मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने पोलीस विभाग व इतर विभागांच्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबाबत वनमंत्री श्री.नाईक यांनी संपूर्ण प्रशासनाचे समाधान व्यक्त केले.
00000