सोलापूर, दिनांक 24:- शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे. सर्वसामान्य जनतेला सामाजिक न्याय देणे शेतकऱ्याचे कल्याण करण्यासाठी केंद्र सरकार प्राथमिकता देत आहे. महिला शेतकऱ्यांची उपस्थिती त्यांचे अधिक योगदान असल्याचे दर्शवते असे प्रतिपादन केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. ते शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूर संचलित कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे आयोजित किसान सन्मान समारोह कार्यक्रमांमध्ये बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूरचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचे संचालक डॉ. राजीव मराठे, श्री. राजाभाऊ सरवदे, कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे उपस्थित होते.
सन्मान निधीच्या एकोणिसाव्या हप्त्याचे वाटप माननीय पंतप्रधान यांच्या शुभहस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. सोलापूर येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूरचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीप गायकवाड यांनी कै. ज्योतीराम गायकवाड यांच्या प्रयत्नातून हे कृषी विज्ञान केंद्र उभे आहे ते शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती देत आहे. सध्या शेतीमध्ये खर्च कमी करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे यासाठी सेंद्रिय शेतीची वाट धरावी लागेल असे प्रतिपादन श्री. आठवले यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मान्यवरासह कृषी प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी कृषी विज्ञान केंद्र सोलापूरच्या माजी प्रशिक्षणार्थीनी उत्पादित केलेले सेंद्रिय अंजीर, हुरडा, श्रीखंड, जात्यावर केलेली तुरदाळ तसेच ज्वारीचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ, नाचणीची बिस्किटे इत्यादींची पाहणी केली. याबरोबरच महिला शेतकरी उत्पादक कंपनी बोरामणी तसेच सेंद्रिय नुट्रीशनल मॉल याबद्दल मंत्री महोदयांनी सखोल अशी माहिती घेतली.
प्रास्ताविकामध्ये कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे यांनी किसान सन्मान निधी योजनेविषयी सविस्तर अशी माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. तसेच कार्यक्रमाच्या आयोजना मागील हेतू स्पष्ट केला.
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचे संचालक डॉ. राजीव मराठे यांनी डाळिंब लागवडीविषयी सविस्तर माहिती दिली. नैसर्गिक शेती व सेंद्रिय निविष्ठांचा वापर याविषयी सेंद्रिय शेती करणारी शेतकरी श्री उमेश श्रीधर देशमुख काळेगाव, तालुका. बार्शी आणि श्री अजित ओक हत्तुर, तालुका. दक्षिण सोलापूर यांनी आपले अनुभव कथन केले. अंतिम सत्रामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे भागलपूर बिहार येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संभाषणाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी काळेगाव सुरडी, दहिटणे, ढोराळे, पिंपरी. तालुका बार्शी बांगी, हतुर, कंदलगाव, बोरामणी. तालुका. दक्षिण सोलापूर, चुंगी, मोठ्याळ, बोरगाव, साफळे, काजीकंवस, किणीवाडी ता. अक्कलकोट येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेषज्ञ अमोल शास्त्री यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप गोंजारी यांनी केले.
00000