मच्छिमार संस्थांसाठी समन्यायी तलाव वाटप धोरण राबवा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २५: राज्यातील सर्व मच्छिमार संस्थांना समन्यायी पद्धतीने तलावांचे वाटप होण्याच्या दृष्टीने आणि तलावांचे वाटप होताना संस्थांच्या सभासद संख्येनुसार तलाव क्षेत्र ठरवणारे धोरण तयार करावे, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

मंत्रालयात भू-जलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या अडचणीबाबत बैठक झाली. त्यावेळी मंत्री बावनकुळे बोलत होते. बैठकीस मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मत्स्यव्यवसाय उद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम यांच्यासह मच्छिमार संस्थांचे प्रतिनिधी आणि विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

तलावांचे वाटप करताना 1 ते 25 सभासद संख्या असलेल्या संस्थेस 50 हेक्टर क्षेत्रापर्यंतचे तलाव देण्यात यावेत, असे सांगून मंत्री बावनकुळे म्हणाले की, त्यापुढील सभासद संख्येनुसार तलावाचे क्षेत्र वाढवत न्यावे. या वाटपाची एक साचेबद्ध रचना करून त्याची तबाबदारी संबंधित क्षेत्र अधिकारी यांच्याकडे सोपवावी. मत्स्यव्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने तसेच व्यवसायामध्ये गुणवत्ता निर्माण करण्यासाठी पीएमसी नेमाव्यात. राज्यातील 6 महसुली विभागांसाठी 6 पीएमसी नेमाव्यात. त्यामुळे मत्स्योत्पादनात चांगली वाढ होईल. विभागाने मच्छिमार संस्थांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे. तसेच उच्च दर्जाचे मत्स्यबीज उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करावे. चांगले मत्स्यबीज उपलब्धतेसाठी निधीची तरतूद करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

राज्यातील सर्व तलावांचे नियंत्रण मत्स्यव्यवसाय विभागाकडे असावे असे सांगून मंत्री बावनकुळे म्हणाले की, यासाठीचा प्रस्ताव तयार करावा. तसेच जिल्हा नियोजनच्या निधीतून किमान 10 टक्के निधी मत्स्यव्यवसायासाठी राखीव ठेवाण्यासाठीचा प्रस्ताव तयार करावा. हे दोन्ही प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवावेत. मत्स्यव्यवसायाला कृषी उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायासाठी सर्वसमावेशक योजना तयार कराव्यात, अशा सूचनाही मंत्री बावनकुळे यांनी दिल्या.

मत्स्योत्पादनात वाढ करणे व पादर्शकता आणणे ही शासनाची भूमिका मंत्री राणे

राज्यातील मत्स्योत्पादनामध्ये वाढ करणे आणि मत्स्यव्यवसायामध्ये पारदर्शकता आणणे ही शासनाची भूमिका असल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

राज्यातील मच्छिमार हे सक्षम आहेत. त्यांना आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, मत्स्योत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने या क्षेत्रात स्पर्धात्मकता आणणे गरजेचे आहे. मच्छिमारांच्या हिताला कोणताही धोका पोहचणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन विभाग करत आहे. त्यामुळे मच्छिमारांचे नुकसान होणार नाही याची खात्री मच्छिमार संस्थांनी बाळगावी. मच्छिमार समजाबाहेरील काही बनावट लोकांनी या व्यवसायामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काही चुकीच्या गोष्टी घडत आहे. यावर नियंत्रण आणणे मच्छिमारांच्या हिताच्या दृष्टीने महत्वाचे आहे. यासाठी विभाग प्रयत्नशिल असून यामुळे मत्स्योत्पादनात वाढ होऊन मच्छिमारांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणाच होणार असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.

राज्यातील तलावांच्या आणि संपूर्ण मत्स्यव्यवसाय विभागाच्या डीजिटलायजेशनचा निर्णय घेण्यात आला असून कोणत्याही मच्छिमार संस्थांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. स्पर्धात्मकता वाढल्यास त्याचा फायदा संस्थांनाच होणार आहे. मोठ्या क्षेत्रावरील तलावांसाठी जास्तीत जास्त संस्था पात्र होऊन त्यामुळे जास्तीचा रोजगार निर्माण होणार आहे. विभाग घेत असलेले निर्णय हे मच्छिमारांच्या फायद्यासाठी असून त्यास संस्थांनी सहकार्य करावे असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी यांनी सर्व राज्यासाठी समान धोरण असावे असं सांगून मत्स्यव्यवसाय वाढीसाठी अतिरिक्त निधीचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती दिली. यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाच्या 2023 मधील शासन निर्णयावरील स्थगिती उठवल्यामुळे मच्छिमारांना होणाऱ्या फायद्यांविषयी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/