चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त पुनर्वसनासाठी समिती स्थापन करा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वन विभागाकडून सहकार्याचे वनमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई, दि. २५: कोल्हापुरातील चांदोली अभयारण्यासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून तातडीने प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळांच्या मंजुरीसाठी पाठविण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भातील प्रलंबित बाबीसंदर्भात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात बैठक झाली. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी भारत पाटणकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

चांदोली अभयारण्यात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पुनर्वसनासंदर्भात प्रलंबित विषय सोडविण्यासाठी पुनर्वसन कायद्यातील 11 ते 14 कलमांच्या अधिसूचनेसंदर्भात योग्य तो मार्ग काढून प्रकल्पग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी, वन विभागाचे अधिकारी तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी यांची समिती स्थापन करून या समितीने अर्थसंकल्पिय अधिवेशनानंतर एक महिन्यात मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव आणावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

चांदोली अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भातील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी वन विभागाच्या वतीने संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी सांगितले.

०००

००००

 

नंदकुमार वाघमारे/विसंअ/