नलेश्वर मध्यम प्रकल्पातील कालवा दुरुस्त करा – मंत्री गिरीश महाजन

विशेष दुरुस्ती योजनेतून कामे करण्याचे निर्देश

मुंबई, दि. २५: नलेश्वर मध्यम प्रकल्पातील कालवा दुरुस्ती कामे विशेष दुरुस्ती योजनेतून करावीत. या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जलसंपदा (विदर्भ,तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाअंतर्गत प्रकल्पांचे कालवा दुरुस्ती व गोसीखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात जलसंपदा मंत्री महाजन यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक घेतली. बैठकीस माजी आमदार शोभा फडणवीस, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभक्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता संजय टाटू, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, अधीक्षक अभियंता राजेश पाटील व प्रवीण झाडे आदी अधिकारी उपस्थित होते.

मंत्री महाजन यांनी सांगितले की, नलेश्वर मध्यम प्रकल्पातील कालवा दुरुस्ती कामांबाबत लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे. कालवा दुरुस्तीची कामे गतीने व दर्जेदार करावीत. ही कामे विहित कालावधीत पूर्ण  करण्यासाठी या कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. याबरोबरच मूल तलाव फिडर संपूर्ण कालवा दुरुस्ती बिगर सिंचन निधीतून करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या

०००

एकनाथ पोवार/विसंअ/