मुंबई, दि. २५: हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम राज्यातील ५ जिल्ह्यांत १० फेब्रुवारीपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात येणाऱ्या औषधोपचारांचा लाभ घेऊन हत्तीरोगापासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
आरोग्यभवन येथे मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची आढावा बैठक झाली. बैठकीस डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक, डॉ. बबिता कमलापूरकर, सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप हत्तीरोग व जलजन्य रोग), डॉ. प्रेमचंद कांबळे सहायक संचालक तसेच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा संबंधित रुग्णांनी लाभ घ्यावा. घरी, कार्यालयात किंवा शाळेत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत देण्यात येणारी औषधे सेवन करावी. त्यामुळे निश्चितपणे आपण हत्तीरोगावर मात करू शकता. आरोग्य विभागाला सर्वांनी सहकार्य करून हत्तीरोगापासून आपला बचाव करावा, असेही मंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील पालघर, नांदेड, गडचिरोली, भंडारा व चंद्रपूर या ५ जिल्ह्यांतील ३४ तालुक्यांमध्ये १० फेब्रुवारीपासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. या पाच जिल्ह्यांमधील एकूण ५४ लाख ९८ हजार ८८४ लोकसंख्येपैकी ५१ लाख ५८ हजार १७० पात्र लाभार्थ्यांना औषध देण्याचे विभागाचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेंतर्गत उपचारासाठी डीईसी, अल्बेंडाझोल आणि आयवरमेक्टिन या औषधी गोळ्या देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने या आजाराचे २०२७ पर्यंत आपल्या देशातून दुरीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे. मागील काळात राज्यातील १८ जिल्ह्यांपैकी १३ जिल्ह्यांतून हत्तीरोगाचे दुरीकरण करण्यात यश आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
०००
अर्चना देशमुख/विसंअ/