आदिवासी भागाच्या विकासासाठी ‘सीएसआर फॉर चेंज’ उपक्रम

देशातील 71 कंपन्यांचा सहभाग

मुंबई, दि. 25 : कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यासाठी आदिवासी विकास विभाग आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृह येथे एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत देशभरातील ७१ कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले. आदिवासी भागातील जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘सीएसआर फॉर चेंज’ उपक्रमांतर्गत महत्वपूर्ण चर्चासत्रे या परिषदेत झाली.

या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, उद्योग विभागाचे सचिव पी.अनबलगन, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, आयुक्त लीना बनसोड उपस्थित होते.

पहिल्या चर्चासत्रात ‘आदिवासी भागात जीवनमान उंचावण्याच्या संधी’ या विषयावर चर्चा झाली. या सत्रात आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, टाटा ट्रस्टचे अमितांशू चौधरी, बजाज इलेक्ट्रिकलच्या मधुरा तळेगावकर, एनएसई फाउंडेशनच्या रेमा मोहन आणि लुपिनच्या तुषरा शंकर यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्राचे संचालन संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या (UNDP) कार्यक्रम प्रमुख श्रीतमा गुप्ता यांनी केले.

दुसऱ्या चर्चासत्रात ‘शिक्षण आणि कौशल्यविकासाद्वारे आदिवासी युवकांचे भविष्य उज्ज्वल करणे’ या विषयावर चर्चा झाली. यात आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त राजेंद्र भारुड, ‘टीसीएस’चे चंद्रशेखर नटराजन, डीएक्ससीच्या गौरी भुरे आणि एचसीएलचे पीयूष वानखेडे यांनी सहभाग घेतला. या सत्राचे संचालन संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे प्रादेशिक प्रमुख जेया चंद्रन यांनी केले.

या चर्चासत्रांमध्ये आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि उद्योग धोरणांवर चर्चा करण्यात आली. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या (सीएसआर) उपक्रमांतून आदिवासी विकासासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार केला.

‘सीएसआर फॉर चेंज’ या उपक्रमाद्वारे आदिवासी समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.