राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेच्या बक्षीसात वाढीचा निर्णय लवकरच – शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर

नागपूर, दि.२७ : विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमासोबतच विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. लवकरच राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेचे बक्षीस वाढवून प्रथम क्रमांकाचे बक्षीस ५१ हजार रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा आज शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी येथे केली.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला धरमपेठ येथील प्रो.राजेंद्रसिंह सायन्स एक्सप्लोरेट्रीमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यमंत्री श्री. भोयर बोलत होते. प्रो.राजेंद्रसिंह सायन्स एक्सप्लोरेट्रीमच्या संचालक डॉ. सीमा उबाळे,  उल्हास औरंगाबादकर, हेमंत चाफले, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

राज्यात शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टीने शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री. भोयर म्हणाले, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून आखण्यात आलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतून भारतात शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडणार आहेत. राज्यातही या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. क्रमीक पाठ्यक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयांमध्ये प्रोत्साहन देण्याचे कार्य शिक्षण विभाग करीत आहे.

विज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठीही शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेचे प्रथम बक्षीस ५ हजार रुपयांवरून ५१ हजार रुपये करण्याचा निर्णय विभागाच्या विचाराधीन असून लवकरच तो जाहीर होऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात प्रोत्साहन देऊन त्यांच्यामधून भविष्यातील वैज्ञानिक घडविण्याच्यादृष्टीने आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तत्पूर्वी श्री भोयर यांनी या ठिकाणी आयोजित विज्ञान प्रदर्शनीतील मांडण्यात आलेल्या विविध प्रयोगांचे निरीक्षण केले.

मुंबई येथील डॉ. होमीभाभा विज्ञान केंद्राच्या बाल वैज्ञानिक स्पर्धेत सरस कामगिरी करणाऱ्या आफिया आफताब, कीर्ती येणुरकर आणि आदित्य रंजन या विद्यार्थ्यांचा राज्यमंत्री श्री. भोयर यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ. सीमा उबाळे यांनी सूत्रसंचालन केले तर हेमंत चाफले यांनी आभार मानले.