शासनाकडून मराठी नाटक, मराठी चित्रपट, कला आणि लोककला तसेच लोकसंस्कृतीला प्रोत्साहन – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

मुंबई, दि. 27 – आपले सरकार इथल्या मातीला नमन करणारे आहे. मराठी नाटक, मराठी सिनेमा, कला आणि लोककला तसेच लोकसंस्कृतीला प्रोत्साहन देणारे आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचलनालय यांच्यातर्फे मराठी भाषा गौरव दिना निमित्त माटुंगा येथे ‘अमृतातेही पैजा जिंके’  या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  मराठी भाषेतील कविता, नाट्यगीत आणि गीतांसह विविध बोली भाषांमधील विविध अविष्कार यावेळी सादर करण्यात आले. मराठी रसिकांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ज्येष्ठ गायिका  उत्तरा केळकर,अभिनेत्री मधुरा वेलणकर, पुष्कर श्रोत्री, मंदार आपटे, माधुरी करमकर, धनंजय म्हसकर आदी कलाकरांचा यामध्ये सहभाग होता. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्यासह महाराष्ट्र मित्र मंडळाचे अध्यक्ष सुनील मोने, सांस्कृतिक विभागाचे संचालक विभीषण चवरे  आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.