मुंबई, दि. २८ : पालघर जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना आरोग्य सेवा उपलबध करुन देण्यास शासनाचे प्राधान्य असून जिल्ह्यातील उमरोळीजवळ धर्मादाय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाकरिता भाडेपट्यावर जमीन उपलब्ध करुन देण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
शारदा प्रतिष्ठान, मुंबई तर्फे डॉ.सचिन खरात यांनी उमरोळी येथे 25 हे.आर. जमीन धर्मादाय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती केली. त्याबाबत महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासंदर्भात आढावा घेण्यात आला. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, शारदा प्रतिष्ठानचे डॉ.खरात यावेळी उपस्थित होते. आमदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, कोकण विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडखे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
महसूल मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, धर्मादाय रुग्णालय सुरू करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. पालघर मधील हे रुग्णालय सुरू झाल्यास या माध्यमातून आदिवासी नागरिकांना सुविधा मिळतील. या कार्याला अंत्योदयाचा स्पर्श असणार असून भविष्यात हे रुग्णालय मुख्यमंत्री सहायता निधीस देखील जोडले जाईल. जिल्हा प्रशासनाने जागेसंदर्भात पाहणी करुन तात्काळ पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी दिले.
0000
बी.सी.झंवर/विसंअ/