मुंबई, दि. ०४ : यशासाठी सातत्य, परिश्रम व प्रामाणिक प्रयत्न यांची आवश्यकता आहे. कायदा क्षेत्र सर्वस्पर्शी असून समाजातील दुर्बल घटकांना कायदेशीर सल्ला व मदत देण्यासाठी कायदा क्षेत्रातील पदवीधरांनी पुढे यावे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व राष्ट्रीय विधी विद्यापिठाचे कुलपती भूषण गवई यांनी केले.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचा द्वितीय पदवी प्रदान सोहळा एनसीपीए झाला. या कार्यक्रमास विद्यापीठाचे प्र-कुलपती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप उके उपस्थित होते. या कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे, न्यायमूर्ती संदीप मारणे, विधि व न्याय विभाग प्रधान सचिव सुवर्णा केवळे, यासह मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सर्वश्री अतुल चांदुरकर, नितीन सांबरे, अनिल किल्लोर, अभय आहुजा, पृथ्वीराज चव्हाण (निवृत्त) तसेच कायदा व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात पदवी व पदव्युत्तर अशा 350 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. विविध अभ्यासक्रमांमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात कुलगुरू प्रा. डॉ. उके यांनी विद्यापीठाने शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाचा आढावा घेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत केलेल्या सामंजस्य करारांची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाचे पुढील 20 वर्षाचे ‘व्हिजन डॉक्युमेंट 2040’ प्रकाशित करण्याते आले. राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी विद्यापीठ यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. संचालक समरेंद्र निंबाळकर व सदस्य सचिव शेखर मूनगटे यांनी करारावर स्वाक्षरी केली.
०००
निलेश तायडे/विसंअ/