देश आणि समाजाच्या विकासात योगदान द्या – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा १२ वा पदवीदान समारंभ उत्साहात

नागपूर, दि. ०४: पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि लाखो लोकांच्या उपजीविकेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या कृषी संलग्न क्षेत्राचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देश आणि समाजाच्या विकासात अनन्यसाधारण योगदान देण्याचे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

सेमिनरी हिल्स येथील पशुवैद्यक महाविद्यालयाच्या रजत जयंती सभागृहात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या बाराव्या पदवीदान कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून राज्यपाल बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या प्र-कुलपती आणि पशुसंवर्धन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, प्रख्यात शास्त्रज्ञ पद्ममविभूषण डॉ. अनिल काकोडकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., माफसूचे कुलगुरु डॉ. नितीन पाटील, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (पशुविज्ञान) डॉ. शिरीष उपाध्ये, कुलसचिव मोना ठाकुर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी व पालक उपस्थित होते.

राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की, समाजाचीही आपल्याकडून अपेक्षा असते. उपस्थित विद्यार्थ्यांचा समर्पणभाव आणि उत्साह पाहून तुमचे योगदान हे निश्चितच आशादायी राहील. 2047 पर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे देशाला जगातील अव्वल क्रमांक करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात आपले योगदान महत्वपूर्ण राहणार आहे. फळाची अपेक्षा न करता आपण कर्म करीत राहण्याची गरज आहे. कठोर परिश्रम कायम ठेवावे. भगवदगीतेमध्येही हेच मर्म सांगितले आहे. संयमाशिवाय यशाचा मार्ग प्रशस्त होत नाही. महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडणे हा शेवट नसून एक नवीन सुरुवात आहे. अधिक कठोर प्रसंगांचा येत्या काळात सामना करावा लागेल. शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतरची  आव्हाने वेगळी असतात. त्याचा निश्चयाने सामना करण्याची गरज असल्याचे राज्यपाल म्हणाले.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे केवळ पशुवैद्यक विज्ञान, दुग्ध तंत्रज्ञान आणि मत्स्यविज्ञान या क्षेत्रांत विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या उत्कृष्ट विद्याशाखांमुळेच वैशिष्ट्यपूर्ण नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारलेल्या १० हून अधिक घटक महाविद्यालयांमुळेही सतत अग्रेसर करीत आहे. याशिवाय, शेतकरी आणि संबंधितांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व मदत पोहोचवण्यासाठी अलीकडेच स्थापित केलेल्या कृषी विज्ञान केंद्रांच्या पाठबळामुळे हे विद्यापीठ अधिक सक्षम आणि प्रभावी बनले असल्याचे राज्यपाल पुढे म्हणाले.

विद्यापीठाच्या प्र-कुलपती आणि पशुसंवर्धन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. राज्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांपासून कोकणच्या किनाऱ्यापासून ते विदर्भ आणि मराठवाड्याच्या विस्तीर्ण मैदानापर्यंत पसरलेली समृद्ध जैवविविधता आहे. विद्यापीठाचे पदवीधर हे राज्यातील आणि देशातील प्राणी संपदा, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य जैवविविधतेचे खरे संरक्षक आहेत. विज्ञानाचा प्रसार करण्याबरोबरच शेतकरी, ग्रामीण तरुण आणि महिलांसारख्या शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्याची आहे. तुमच्या ज्ञानाने आणि शिकलेल्या कौशल्याने समाज आणि राज्यासाठी एक महत्वपूर्ण बलस्थान सिद्ध व्हावे, असे मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर म्हणाले की, ग्रामीण समृद्धी ही केवळ चांगल्या रस्त्यांवर आणि विजेवर अवलंबून नाही तर ती शाश्वत उपजीविका, आर्थिक स्वावलंबन आणि प्रत्येक कुटुंबाला सकस पोषण व सन्मानजनक जीवनमान मिळेल यावर आधारित असते. या दृष्टीने पशुधन क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय, शेळीपालन व मेंढीपालन हे केवळ व्यवसाय नाहीत, तर ती कोट्यवधी लोकांसाठी जीवनाधार आहेत. जर आपण या क्षेत्राला बळकटी दिली, तर आपोआप ग्रामीण भारत मजबूत होईल.

साहिलला सर्वाधिक नऊ पदके

समारंभात एकूण ७०३ पदवीधारकांना पद‌वी प्रदान करण्यात आली. ज्यामध्ये पशुवैद्यक शाखेचे ३८० स्नातक विद्यार्थी, मत्स्य विज्ञान शाखेचे ५७ स्नातक विद्यार्थी, दुग्ध तंत्रज्ञान शाखेचे ५३ स्नातक विद्यार्थी, पशुविज्ञान शाखेचे २०५ स्नातकोत्तर विद्यार्थी, दुग्ध तंत्रज्ञान शाखेचा १ स्नातकोत्तर विद्यार्थी आणि पशुविज्ञान शाखेच्या ७ आचार्य विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दीक्षांत समारंभात साहिल या विद्यार्थ्यास सर्वाधिक नऊ पदके मिळाली. नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल याने एकूण ६ सुवर्ण आणि ३ रौप्य पदके प्राप्त केली. दीक्षांत समारंभात गुणवंत पदविधारकांना ३० सुवर्ण, ०८ रौप्य पदके आणि १ रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

०००