मुंबई, दि. ०७ : मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या (सीएमआरएफ) माध्यमातून राज्यातील गरजू रुग्णांना विविध आजारांसाठी आर्थिक साहाय्य करण्यात येते. या कक्षाची व्यापकता वाढविण्यासाठी टाटा ट्रस्ट वैयक्तिक अनुदान कार्यक्रमाच्या (आयजीपी) समन्वयातून जास्तीत जास्त गरजू रुग्णांना आर्थिक साहाय्य करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
टाटा ट्रस्टचे चेअरमन नोवेल टाटा हे गेल्या अनेक दशकांपासून वैद्यकीय क्षेत्रात गरजू रुग्णांच्या उपचारासाठी टाटा ट्रस्ट वैयक्तिक अनुदान कार्यक्रमाच्या (आयजीपी) माध्यमातून आर्थिक मदत करीत आहे. आतापर्यंत लाखो रुग्णांना या वैद्यकीय मदतीचा लाभ झाला आहे. टाटा ट्रस्ट मार्फत सुरू असणारे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य पाहून मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व टाटा ट्रस्ट वैयक्तिक अनुदान कार्यक्रम यांनी संयुक्तिकरित्या कार्य करणे अधिक प्रभावी ठरणार आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातील व्याधींच्या यादीत वाढ करण्यात येणार आहे. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय उपचारांच्या गंभीर परिस्थितींशी निगडित खर्चासाठी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देणारा स्त्रोत निर्माण करणे शक्य होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व टाटा ट्रस्ट वैयक्तिक अनुदान कार्यक्रम यांनी एकत्रितपणे कार्य केल्यास उपचार होणाऱ्या आजारांच्या संख्येत वाढ करून अधिक व्यापक प्रमाणात त्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयांची संख्या देखील वाढवता येणार आहे. यामार्फत गरजू रुग्णांना वैद्यकीय खर्चातील मदतीसाठी सुलभता येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व टाटा ट्रस्ट वैयक्तिक अनुदान कार्यक्रम संलग्नरित्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून कामास सुरुवात करतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
०००
अर्चना देशमुख/विसंअ/