- मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांच्या काव्य वाचनाने रसिक तृप्त
मुंबई, दि. ०७ : ‘अज्ज आखाँ वारिस शाह नूं, कितों कबरां विच्चों बोल’ या कवयित्री अमृता प्रीतम यांची ही कविता 1947 मध्ये झालेल्या फाळणीची प्रतिकात्मक रचना मानली जाते. फाळणीसारख्या हिंसाचाराचे बळी ठरलेल्या लोकांचा आवाज ही कविता (नज़्म) बनली, इतिहासाच्या एका महत्त्वाच्या क्षणी लिहिली गेली आणि स्वतःच इतिहासाचा एक भाग बनली. अशा अत्यंत लोकप्रिय कवितेने ‘चौराहा’ – एक बहुभाषिक काव्यसंध्ये’ ची सुरुवात राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केली.
नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला स्त्रीशक्तीची क्षितीजे रुंदावणारा ‘चौराहा’ – एक बहुभाषिक काव्यसंध्या’ हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमात मुख्य सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संचालक निधी चौधरी, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी कविता सादर केल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांनी आपले अनुभव, विचार आणि संवेदना व्यक्त करणाऱ्या कविता सादर केल्या. वेगवेगळ्या क्षेत्रांतील महिलांचे अनुभव शब्दांत गुंफताना समाजातील वास्तव, स्त्रीशक्तीचा उलगडा आणि पुढील वाटचाल यावर प्रकाश टाकण्यात आला. या काव्यवाचनाने श्रोत्यांना एक वेगळी आत्मनुभूती दिली.
मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी सागरी किनारी एनसीपीए येथे अत्यंत रम्य वातावरणात हा कार्यक्रम होत आहे आणि कार्यक्रमात कविता सादर करण्यासाठी आपल्याला बोलावलं याबद्दल आभार मानले.
कवितांमधून उमटले स्त्रीजीवनातील संघर्ष, स्वप्ने, आत्मनिर्भरता आणि समाजातील बदलांचे प्रतिबिंब
सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, यांनी सादर केलेली अपर मुख्य सचिव अनुपकुमार यादव लिखित ‘टपाल’ या कवितेला सर्वांनी दाद दिली. आठवडी टपालने अहवाल पाठवा, बैठकीसाठी हवा आहे तात्काळ पाठवा, पाठविले तरी मिळाले नाही म्हणून पाठवा, बाबूनी हरविले आहे म्हणून पाठवा, मिळाले तरी सापडले नाही पुन्हा पाठवा, प्रपत्र भरून जोडले नाही पुन्हा पाठवा ऑनलाईन, फॅक्स पाठवा रजिस्ट्री पाठवा ई-मेल पाठवा, शिपाई पाठवा मेल किंवा फीमेल पाठवा,पाठवा पाठवा पाठवा पाठवा पाठवा, अहवाल पाठवा अहवाल पाठवा अहवाल पाठवा या कवितेने कार्यालयातील वातावरण रसिकांसमोर उभे केले.
कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी ‘अभिव्यक्ती’ ही कविता सादर केली. तसेच कठीण प्रसंगी अनुभवल्या जाणाऱ्या परिस्थितीशी अनुरूप कविताही सादर केल्या. ‘आयुष्य हे मुक्तपणे जगा’ ही कविता इंग्रजी भाषेत सादर केली.
मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे यांनी आधुनिक स्त्रीच्या संवेदना असलेल्या कवयित्री नीरजा यांची कविता सादर केली. सिंधूताई सपकाळ यांची ‘ किती बंडखोरी वसे आत माझ्या निघाले पुन्हा मी विरोधात माझ्या, जरा त्या सुखाची कमी कौतुके कर, कधी वेदनाही म्हणाव्यात माझ्या’ या कविता उपस्थितीतांची दाद मिळवून गेल्या.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी धैर्यवान असलेल्या लडाखी महिलेची कविता सादर केली.
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संचालक निधी चौधरी यांनी स्वरचित कविता सादर केल्या. मृत्यूविषयक कविताही त्यांनी सादर केली. क्षणभंगुर आज हूँ कल नहीं,शायद अगले पल नहीं,फिर भी कर्मों में बंधी,अपने धर्मों में धंसी,
जीवन को लेना चाहूँ समेट,अपनी बाहों में लपेट,मृत्यु को नकार कर,जीवन को पुकार कर,जीना चाहूँ अनेक वर्ष,
जीवन मृत्यु के खेल में,सुख-दुःख की रेलमपेल में,
मैं क्षणभंगुर! मैं क्षणभंगुर! कवितेने वातावरण भारावून गेले.
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी कवी पुष्यमित्र उपाध्याय यांची
सुनो द्रौपदी ! शस्त्र उठालो अब गोविंद आएंगे…
छोड़ो मेहंदी खड्ग संभालो, खुद ही अपना चीर बचा लो
द्यूत बिछाए बैठे शकुनि,.मस्तक सब बिक जाएंगे
सुनो द्रौपदी! शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे ही कविता सादर केली.
‘एनसीपीए’च्या पहिल्या महिला संचालक विजया मेहता यांनी २० वर्षांपूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात केली. या ऐतिहासिक साहित्य उपक्रमाची आज पुन्हा सुरुवात करण्यात आली. ‘चौराहा’ या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून साहित्य क्षेत्रातही योगदान दिले. त्यांच्या कवितांमधून स्त्रीजीवनातील संघर्ष, स्वप्ने, आत्मनिर्भरता आणि समाजातील बदलांचे प्रतिबिंब उमटले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, एनसीपीएचे टेक्निकल मुख्य अधिकारी नयन काळे तसेच मंत्रालयातील अधिकारी व श्रोते कार्यक्रमाला उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाच्या लीना संखे, उपसचिव अजित कवडे यांनी आभार मानले.
०००
संध्या गरवारे/विसंअ