- या प्रकल्पास राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल
- पतंजली व राज्य शासन या प्रकल्पात आधुनिक नर्सरी उभारेल
नागपूर, दि. ०९ : पतंजली फुड व हर्बल पार्कच्या माध्यमातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करून तो बाजारपेठेत जाणार आहे. संत्र्याची ग्रेडींग, साठवणही येथे होणार असून हा प्रकल्प संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. या प्रकल्पास राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून पतंजली व राज्य शासन संयुक्तपणे सर्व सोयींनी सज्ज अशी नर्सरी येथे उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
येथील मिहान परिसरात स्थित पतंजली फुड आणि हर्बल पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. योगगुरु स्वामी रामदेव बाबा, पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार सर्वश्री डॉ. आशिष देशमुख, समीर मेघे आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ९ वर्षांपूर्वी मिहानमध्ये पतंजलीने पाया रचला. त्यानंतर बऱ्याच अडचणी आल्या तरीही न डगमगता त्यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. पतंजली उद्योग समुहाला नागपुरात मिहानमध्ये आमंत्रित केले, त्याचवेळी विविध राज्यातून या समुहाला त्या-त्या राज्यांमध्ये उद्योग उभारण्यास बोलावण्यात येऊ लागले. मात्र, मिहानमध्येच हा प्रकल्प उभारण्याचा संकल्प घेऊन व राज्य शासनाच्या रितसर निविदा प्रक्रियेचा अवलंब करुन आज हा प्रकल्प उभा राहिला.
या प्रकल्पासाठी आवश्यक माल संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून पुरविला जाईल. यामुळे शेतकऱ्यांचा मालही विकला जाईल. या प्रकल्पात संत्र्यावर प्रक्रिया केली जाईल. तसेच संत्रा साठवणुकीसाठी अत्याधुनिक शीतगृहेही येथे उपलब्ध आहेत. याचा फायदाही शेतकऱ्यांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. याठिकाणी संत्र्यासाठी आवश्यक असणाऱ्या दर्जेदार कलमे तयार करण्याकरिता पतंजली आणि राज्य शासन संयुक्तपणे सर्व सुविधांनीयुक्त आधुनिक नर्सरी उभारेल, असेही त्यांनी सांगितले.
पतंजली प्रकल्पामुळे रोजगार व संत्र्याला बाजारपेठ – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पतंजलीच्या मिहानस्थित फुड आणि हर्बल प्रकल्पासाठी दिवसाला जवळपास ८०० टन संत्र्यांची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला आपसुकच बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. या प्रकल्पास शेतकऱ्याचे पूर्ण सहकार्य लाभेल व लिंबुवर्गीय फळांचा पुरवठाही करण्यात येईल. या प्रकल्पाद्वारे शेतकरी समृद्ध होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. उत्तम संत्रा बीज आणि कलम निर्मितीसाठी आधुनिक नर्सरी उभारण्याची मागणी त्यांनी यावेळी राज्य शासनाकडे केली.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पतंजली फुड आणि हर्बल पार्कच्या कोनशिलेचे अनावरण आणि प्रकल्पाचे विधीवत उद्घाटन झाले.
०००