मुंबई, दि. ०९ : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची व परंपरेची ओळख होण्यासाठी कोकणातील प्रसिद्ध कोळी गीत नृत्य परंपरा माहिती व्हावी या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2025 बोहाडा आदिवासी गीत नृत्य महोत्सवाचे आजपासून आयोजन करण्यात आले आहे. दि. 11 मार्च पर्यंत हा महोत्सव असेल. सायं. 6.30 वा. श्री. अनंतराव ठाकूर नाट्यगृह देशपांडे वाडा, पारनाका, वसई (प.). येथे हा महोत्सव होईल.
महोत्सवात 9 रोजी आई जगदंबा ग्रुप ढोल नाच, घोसाळी, हिरवा देव मोरघा ग्रुप, वनवासी, गावदेवी तारपा नृत्य, घोडीचापाडा यांचे सादरीकरण होईल.
तर सोमवार 10 मार्च 2025 रोजी आदिवासी बोहाडा नंदी नृत्य, घोसाळी, आदिवासी जगदंबा माता बोहाडा, घिवंडा व आदिवासी कंणसरी तारपा नृत्य खांड, नालीपाडा या पथकाचे सादरीकरण होणार आहे. या महोत्सवाचा समरोप मंगळवार 11 मार्च 2025 रोजी होणार असून या महोत्सवात जय आदिवासी तूर नाच, डोलारी बुद्रुक, हिरवा देव ढोलनाच, वांगणपाडा, आदिवासी तारपा नृत्य, मोडध्याचापाडा यांच्या कला सादरीकरणाने होईल.
बोहाडा हा आदिवासी गीत नृत्य महोत्सव रसिक प्रेक्षकासाठी विनामूल्य आहे. रसिक, प्रेक्षकांनी याचा आस्वाद घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
०००