कोल्हापूर, दि. ०९ (जिमाका): सध्या जिल्ह्यात विविध विभागांमार्फत विकासकामे सुरु असून ती दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड नको असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर अंतर्गत शहरात व जिल्ह्यात विविध विभागांकडे सुरु असलेल्या विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला.
मार्च २०२६ पर्यंत सुरु असलेल्या इमारती पुर्णत्वाकडे नेण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाने कार्यरत रहावे. मात्र हे करताना गुणवत्तेकडे दुर्लक्ष करु नये. सर्व विभागांनी आपआपसात समन्य ठेवावा. जिल्ह्यातील कामांची संपूर्ण राज्याने दखल घ्यावी, असे आदर्शवत काम व्हावे अशी अपेक्षा त्यांनी बैठकीत व्यक्त केली.
यावेळी पालकमंत्री आबिटकर यांनी शहरात सुरु असलेली रस्त्यांची कामे, प्रादेशिक मनोरुग्ण रुग्णालय, सांगाव (कागल) येथील वैद्यकीय महाविद्यालय, श्री क्षेत्र आदमापूर येथील विकास आराखडा, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय इमारत देखभाल व दुरुस्ती त्याचबरोबर शेंडा पार्क येथे उभारण्यात येणारी वैद्यकीय महाविद्यालय इमारत, वसतीगृह, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, शेंडा पार्क येथे उभारण्यात येणारी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तसेच सारथीची इमारत आदींचा आढावा घेतला.
लवकरच बाळूमामाच्या यात्रेला सुरुवात होत असून भाविकांची गैरसोय होवू नये याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची सूचना केली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता तुषार बुरुड, क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, बी. एल हजारे, सी. ए. आयरेकर, महेश कांजर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन साळे, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, इफ्तेकार मुल्ला, बाळुमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, आदमापूरचे सरपंच विजय गुरव आदी उपस्थित होते.
०००