उपलब्ध पाण्याचे नियोजन करा -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जलसंपदा विभागाचा पालकमंत्र्यांकडून आढावा

कोल्हापूर, दि. ०९ (जिमाका) : यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र स्वरुपाचा असेल असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा. नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना पाणी टंचाई जाणवू नये याची दक्षता घेवून धरणातील उपलब्ध पाण्याचे योग्य ते नियोजन जलसंपदा विभागाने करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

जलसंपदा विभागामार्फत जिल्ह्यात विविध प्रकल्पांचे बांधकाम सुरु आहे तसेच व्यवस्थापनाच्या अनुषंगाने ही बैठक झाली. सध्या जरी पाणी टंचाई जाणवत नसली तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांनी पूरनियंत्रण काम तसेच कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापन उत्तर व दक्षिणचा आढावा त्याचबरोबर दूधगंगा, वारणा, धामणी, सर्फनाला, नागणवाडी, घटप्रभा आदी ठिकाणी सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला.

यावेळी जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, एस.आर. पाटील, डी.डी. शिंदे, स्मिता माने आदी उपस्थित होते.

०००