मुंबई,दि.१० :आयसीसी चॅम्पियन करंडक २०२५ स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने अजिंक्यपद पटकावल्याबद्दल विधानपरिषदेत अभिनंदनाचा ठराव सभागृहनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला.
सभागृहात भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयावर गौरवोद्गार काढण्यात आले आणि संपूर्ण देशासाठी हा विजय अभिमानास्पद असल्याचे सांगण्यात आले.
अभिनंदन ठरावावर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले,भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत एकही सामना न गमावता अंतिम सामना जिंकत चॅम्पियन करंडकावर आपले नाव कोरले. विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्यासह संपूर्ण संघाने उल्लेखनीय योगदान दिले. संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने १२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर तिसऱ्यांदा हा प्रतिष्ठेचा करंडक पटकावला आहे.
सभागृहात नेत्यांनी भारताच्या सलग दुसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विजयाचे विशेष कौतुक केले. आठ महिन्यांपूर्वी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारताने पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्चस्व प्रस्थापित केले आहे. हा विजय भारतीय क्रीडा क्षेत्राच्या नव्या युगाचे प्रतीक असल्याचे सभागृहात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले
यावेळी भारतीय क्रिकेट संघाला भविष्यातही अशाच उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य भाई जगताप, शशिकांत शिंदे, मनीषा कांयदे यांनी अभिनंदन प्रस्तावाचे समर्थन केले.
००००
राजू धोत्रे/विसंअ/