मुंबई, दि. १०: सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्ती व देखभालीची कामे पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी आणि आगामी पावसाळ्यात पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी तात्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
मंत्रालयात जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेओहोळ मध्यम प्रकल्प तसेच इतर प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप वळसे पाटील, सत्यजित देशमुख, मनोज घोरपडे, अमल महाडिक, महेश लांडगे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता अ. ना. पाठक, जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) हनुमंत धुमाळ उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्प स्थळांना भेटी देऊन पाहणी करावी. शेतकरी आणि नागरिकांच्या हितासाठी सिंचन व्यवस्था कार्यक्षम राहण्यासाठी दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करावी. तसेच पाण्याच्या पुनर्वापरावर भर द्यावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील प्रकल्पांचा, इंद्रापूर मतदारसंघातील निरा व भीमा नदीवर अत्याधुनिक यंत्रणा सुसज्ज बॅरेजेसच्या धर्तीवर नवे बॅरेजेस व सरंक्षण घाट बांधणेबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.
शिराळा मतदारसंघातील जलसंपदा विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. शिराळा तालुक्यातील वारणा डावा कालव्यातील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी विशेष दुरुस्तीमध्ये कालव्याचे अस्तरीकरण करण्याच्या सूचना श्री. विखे पाटील यांनी दिल्या. कराड उत्तर मतदारसंघातील कामांसंदर्भात कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या पूर परिस्थिती विषयी उपाययोजना करण्याविषयी चर्चा करण्यात आली.
०००
मोहिनी राणे/ससं/