ग्रामीण भागात मागणीप्रमाणे पिण्याचे पाणी उपलब्ध करा – मंत्री गुलाबराव पाटील

सांगली जिल्ह्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत कामांचा आढावा

मुंबई, दि. १० : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ही बाब महत्वपूर्ण असून त्याचे गांभिर्य लक्षात घेऊन गावांमध्ये वाढीव मागणीप्रमाणे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित सांगली जिल्ह्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत कामाच्या आढावा बैठकीत मंत्री पाटील बोलत होते. बैठकीस आमदार जयंत पाटील, सत्यजीत देशमुख, विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्यासह जलजीवन मिशन तसेच स्थानिक संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

पाणी पुरवठा मंत्री पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा तालुक्यातील विविध गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन ज्या गावांमध्ये गावकऱ्यांची वाढीव पाण्याची गरज व मागणी आहे, त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करुन योग्य उपाययोजना करुन त्यानुसार पाण्याची उपलब्धता करुन देण्यात याव्यात. या दोन्ही तालुक्यातील गावांमधील सुधारित नळ पाणी पुरवठा योजना, जलजीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अतंर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत विविध कामांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

०००

वंदना थोरात/विसंअ/