विधानसभा लक्षवेधी
विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भोंग्यांबाबत तक्रार येऊन कारवाई न केल्यास संबंधित पोलीस निरीक्षक जबाबदार
मुंबई, दि. ११ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रार्थनास्थळावर भोंगे वाजविण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे बंद असले पाहिजे. विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच याबाबतीत असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
सदस्य देवयानी फरांदे यांनी अनधिकृत भोंगे लावून ध्वनी प्रदूषणा बाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य अतुल भातखळकर यांनी सहभाग घेतला.
सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या भोंग्यांची परवानगी, नियमांच्या पालनाबाबत तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांच्यावर राहील. याबाबत तक्रारी आल्यास व कारवाई न केल्यास संबंधित पोलीस निरीक्षकास जबाबदार धरण्यात येईल.
राज्यात ध्वनी प्रदूषणाबाबत एकसूत्रीपणा येण्यासाठी पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ व ध्वनी प्रदूषण (विनियम व नियंत्रण) अधिनियम २००० अन्वये कार्यवाही करताना प्रमाणित कार्यप्रणाली निर्गमित करण्यात आली आहे. या कार्यप्रणालीनुसार सर्व प्रार्थनास्थळांवर तसेच इतर ठिकाणी भोंगे वाजविण्याबाबत ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमाप्रमाणे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमाप्रमाणे दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री दहा वाजेपर्यंत ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे.
आवाजाची मर्यादा तपासण्याचे मशीन सर्व पोलीस स्टेशनला उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे वापर करण्यावर बंदी आहे. याबाबत असलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे भोंगे जप्त करण्यात येतील. भोंग्याबाबत ध्वनी प्रदूषणाची तक्रार प्राप्त झाल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. याबाबत पोलीस प्रशासनाकडून प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत कारवाई करण्याचे तक्रार अर्ज पाहणी अहवालासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील. प्राप्त अहवालाची पडताळणी करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नियमानुसार संबंधित न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
0000
नीलेश तायडे/विसंअ/
गडचिरोलीतील निकृष्ट आणि अनियमित तांदूळ पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई– उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. ११ : गडचिरोली जिल्ह्यात अनियमित आणि निकृष्ट दर्जाच्या तांदूळ पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, यासंदर्भात अहवाल मागवून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य नाना पटोले आणि सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवून दोषींवर तातडीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून तांदळाच्या पुरवठा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणली जाईल. आवश्यकता भासल्यास या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) नेमले जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
0000
काशीबाई थोरात/विसंअ/
इचलकरंजी पाणीपुरवठा प्रकल्प वेगाने पूर्ण करणार– उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. ११ : इचलकरंजी शहरासाठी पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या पंचगंगा आणि कृष्णा नदीतून ४५ दललिटर (MLD) पाणी उपसा केला जात आहे. तसेच, जुनी आणि जीर्ण झालेली पाईपलाइन बदलण्याचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेऊन इचलकरंजी पाणीपुरवठा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
सदस्य राहूल आवडे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, कृष्णा नदी मजरेवाडी उद्भव योजना शहरापासून १८.३३ किमी वर सन २००१ पासून आहे. पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन जुनी झाल्याने वारंवार गळती होत होती. त्यामुळे तीन टप्प्यात पाईपलाइन बदलण्याचे काम सुरू असून, त्यासाठी ५४.५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या प्रकल्पांतर्गत १८.३३५ किमी पाईपलाइन पैकी १६.४० किमी पाईपलाइन बदलण्यात आली आहे, तर उर्वरित १.९३५ किमी काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर महानगरपालिकेकडून ४५ MLD पाणी उपसा करून शहरातील नागरिकांना नियमित पुरवठा करण्यात येईल.
इचलकरंजी शहराची भविष्यातील पाणीपुरवठा गरज लक्षात घेऊन केंद्र पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत दूधगंगा नदी (सुळकुड उद्भव) येथून नवीन पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी १६०.८४ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पास स्थानिक नागरिकांचा विरोध होता तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली, या समितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.पुढील कार्यवाही सुरू असून. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक घेण्यात येईल, असेही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
0000
काशीबाई थोरात/विसंअ/
पुणे शहरात सुरळीत वाहतुकीसाठी ‘एआय’ वर आधारित वाहतूक सिग्नल प्रणाली – गृहराज्यमंत्री योगेश कदम
मुंबई, दि. ११ :- पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. तसेच पुणे शहरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित वाहतूक सिग्नल प्रणाली विकसित करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी दिली.
सदस्य चेतन तुपे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.
ड्रंक अँड ड्राईव्ह संदर्भातीला कायदा अधिक कडक केला जाणार असल्याचे सांगून राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, या गुन्ह्यातील अपराधीवर कठोर कारवाई केली जाणार आहे. अशा गुन्ह्यातील आरोपींची लवकर सुटका होऊ नये यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक विभाग आणि पोलिस यंत्रणेचा समन्वय वाढविला जाईल. शहरातील वाहतूक नियमन, स्पीड ब्रेकर, अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांवर उपाययोजना व अपघात होत असलेल्या ठिकाणी स्पीड ब्रेकर, सिग्नल सिस्टिम आणि अन्य सुरक्षात्मक उपाय करण्यावर भर देण्यात येईल. पुणे शहरात वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भातही निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली.
राज्यमंत्री कदम म्हणाले, लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केलेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून. अशा घटना घडू नयेत म्हणून महापालिका व पोलिस यंत्रणेने आवश्यक उपाययोजना करण्यास प्राधान्य द्यावे.
००००
एकनाथ पोवार/विसंअ/