नाशिक, दि. ११ (जिमाका): नाशिक शहरात ९० च्या दशकानंतर मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आहे. राज्यातील प्रमुख औद्योगिक शहरांमध्ये नाशिक शहर महत्त्वाचे ठरले असून नाशिकच्या विकासात उद्योगांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.
राज्याच्या उद्योग संचालनालयातर्फे हॉटेल द गेट वे येथील आयोजित इन्व्हस्टमेंट समीट नाशिक २०२५ मध्ये डॉ. गेडाम बोलत होते. यावेळी ‘मैत्री’च्या समन्वय अधिकारी प्रियदर्शिंनी सोनार, उद्योग विभागाच्या सह संचालक वृषाली सोने, नाशिक डाकघरचे प्रवर अधिक्षक प्रफुल्ल वाणी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, भारतीय लघु उद्योग विकास बँकेचे सचिन सोनटक्के, ‘निमा’चे अध्यक्ष ललित बूब, आयडीबीआय बँकेचे न्यू इंडिया इन्शोरन्सचे सहाय्यक व्यवस्थापक अनुप चव्हाण, एमसीसीआयए चे चेअरमन सी.एस.सिंग, इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कांउन्सिलचे प्रादेशिक संचालक सी.एच.नादीगर यांच्यासह अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.
डॉ. गेडाम म्हणाले की, नाशिकला व वायनरी उद्योग व पर्यटनक्षेत्रात अधिक संधी आहे. येणाऱ्या दोन वर्षात नाशिकच्या विकासाला निश्चित चालना मिळणार आहे. यात नाशिक ते पुणे व मुंबईपर्यंत जाणारा समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होणार आहे. पुणे शहराच्या धर्तीवरच नाशिकलाही याचा लाभ होणार आहे. नाशिक येथे सुरू झालेल्या विमानतळामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विमानतळाचा विस्तार होणे गरजेचे आहे. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक शहरासाठी पायाभून सुविधांसाठी अनेक प्रकल्प विचाराधीन आहेत. यात रस्ते, मेट्रोसह विविध प्रकल्पांचा समावेश आहे. उद्योगांचे लहान प्रश्नांचे स्थानिक पातळीवर निराकरण होणे गरजेचे असून मोठे धोरणात्मक प्रश्नांचा प्राधान्यक्रम ठरवून ते कसे सोडविण्याच्या दृष्टीने नियोजन उद्योग विभागाने करावे. कुंभमेळ्याच्या दृष्टीन नाशिकचे ब्रँडिंग करण्याची मोठी संधी आहे. यामुळे उद्योगांना गुंतवणुकीस मोठा मंच उपलब्ध होणार आहे. सर्व क्षेत्रातील उद्योगांनी आपली क्षमता ओळखून विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकणे गरजेचे असून नाशिकचे नाव अग्रेसर करण्यात सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजे.
आज झालेल्या गुंतवणूक बैठकित नाशिक 2025 मध्ये 142 उद्योगांचे सामंजस्य करार झाले. यातून 6 हजार 404 कोटी रूपयांची गुंतवणूक झाली असून 14 हजार 403 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
०००