शेतकरी व गोरगरीब जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील

0
11

मुंबई दि.6 :- अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकरी,कष्टकरी,आदिवासी, महिला व युवक अशा सर्व घटकांना दिलासा देणारा आहे. या अर्थसंकल्पाचे आपण स्वागत करतो अशी प्रतिक्रिया राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

मंत्री श्री.पाटील म्हणाले,ग्रामीण भागातील जनतेला पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागात शाश्वत स्वच्छता ठेवणे तसेच हर घर नल से  जलया उद्देशाने राज्यातील प्रत्येक घरात नळजोडणीद्वारे पेयजल सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी सन 2020-21 या वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता या विभागासाठी  2 हजार  42 कोटी रुपये इतका नियतव्यय या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आला आहे.

मराठवाडा विभागातील सततच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीडची आखणी करण्यात आली आहे.पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, लातूर व औरंगाबाद जिल्ह्यातील अधिक टंचाईग्रस्त काही तालुक्यांसाठी उजनी तथा जायकवाडी धरणातून प्रकल्प अंमलबजावणी नियोजित आहे. त्यासाठी सन 2020-21 या वर्षात 200 कोटी रुपयांचा  नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे.देशातील सर्व घरांना सन 2024 पर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने यापूर्वी सुरू केलेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम पुनर्रचित करून तो जलजीवन मिशन या नवीन कार्यक्रमांतर्गत अंतर्भूत केला आहे. राज्यातील एकूण दहा हजार नवीन पाणीपुरवठा योजनांचा समावेश या अभियानांतर्गत करण्यात आला येणार आहे. यासाठी सन 2020-21 या वर्षात 1 हजार 230 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. 

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल भरपाई, पीक विमा योजनेत सुधारणा यासारखे क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले आहेत. आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे  तसेच गरिबांना दहा रुपयांमध्ये जेवण देणाऱ्या शिवभोजन थाळीच्या लाभार्थींची संख्या दुप्पट करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या निर्णयाबद्दल आपण मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो असेही मंत्री श्री.पाटील यांनी म्हटले आहे.

००००

देवेंद्र पाटील/विसंअ/6.3.2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here