मुंबई दि. १२ : महाराष्ट्र सागरी मंडळांतर्गत सुरू असलेली कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत, मत्स्य व्यवसायासाठी बंदरांचा विकास करणे तसेच जल पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुविधा उपलब्ध कराव्या, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कामकाजासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली.
मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले की, रेडिओ क्लब येथे प्रवासी जेट्टी, टर्मिनल इमारत व तत्सम सुविधा पुरविण्यात याव्यात. यासाठी आवश्यक जागा निश्चित करावी. तसेच, राष्ट्रीय जलमार्ग ५३ अंतर्गत डोंबिवली येथे जेट्टीचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करावे. सागरी महामार्गालगत असलेल्या व्यवसायामार्फत मिळणारा महसूल पर्यटकांची सुरक्षा, जलपर्यटन, जेट्टी देखभाल दुरूस्तीसाठी प्राधान्याने खर्च करावा, जेट्टी संदर्भात धोरण आखण्यात यावे असे निर्देश श्री. राणे यांनी दिले.
रत्नागिरी येथील साखरीनाटे मत्स्यबंदराचा विकास करणे, रायगड येथील दिघी या जुन्या जेट्टीची लांबी व रूंदी वाढवून तेथे लिंकस्पॅन बसविणे, वेंगुर्ला येथे पर्यटनासाठी पाईल जेट्टीचे बांधकाम करणे व तत्सम सुविधा निर्माण करणे, काशिद येथे रो-रो सेवेकरिता तरंगती जेट्टी व तत्सम सुविधा निर्माण करणे, देवबाग येथील कर्ली नदीच्या तटाचे संरक्षण करणे संदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
बैठकीत अपर मुख्य सचिव संजय सेठी, सागरी महामंडळाचे मुख्य अभियंता पी प्रदीप, मुंबई बंदर प्राधिकरणचे अध्यक्ष सुशील कुमार सिंह, जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीचे अध्यक्ष उमेश वाघ तसेच भारतीय नौसेनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ/