पानिपत येथे ‘मराठा शौर्य स्मारक’ होणार – मंत्री जयकुमार रावल

मुंबई दि. १३: हरियाणातील पानिपत येथे मराठा युद्धवीरांचे शौर्य स्मारक राज्य शासनाच्या वतीने उभारले जाईल, अशी घोषणा मराठा शौर्य दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. त्यानुसार शासन आदेश निर्गमित झाला आहे. शासनाच्या वतीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून पानिपत येथील ‘काला अंब’ परिसरात लवकरच ‘मराठा शौर्य स्मारक’ उभारले जाईल, अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

या यासंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री रावल म्हणाले की, हरियाणा राज्यातील ‘कालाअंब’ येथे लवकरच या स्मारकासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होईल. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजा यांचा भव्य पुतळा उभा केला जाईल. तसेच मराठा शौर्याचे प्रतीक असणारे संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम व आवश्यक त्या सुविधा निर्माण केल्या जातील. यासाठी हरियाणा राज्य शासनाशी समन्वय साधण्यासाठी मी स्वत: समन्वयक म्हणून काम करणार आहे. या प्रकल्पाला जमीन अधिग्रहित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास विभाग नोडल यंत्रणा म्हणून काम करणार आहे. मराठा साम्राज्याचा जाज्वल्य इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक ते उपक्रम राबवण्यात येतील.

सतराव्या आणि अठराव्या शतकात मराठा साम्राज्याचा विस्तार अफगानिस्तानापर्यंत झाला होता. मराठा शौर्य वीरांच्या अतुलनीय पराक्रमामुळे अटक पासून ते कटक पर्यंत हिंदवी स्वराज्याचा झेंडा रोवला गेला. १७६१ साली अहमदशाह अब्दाली विरुद्ध झालेल्या पानिपत रणसंग्रामामध्ये मराठा वीरांनी झुंज दिली. या लढाईत मराठा साम्राज्याची अपरिमित अशी हानी झाली, मात्र इतिहासामध्ये ही लढाई त्याग, बलिदान, राष्ट्रप्रेम, लढाऊ वृत्ती, राष्ट्राकरिता संपूर्ण समर्पण या करिता संस्मरणीय आहे. तसेच या युद्धातील मराठा वीरांच्या बलिदानाला नमन करण्याच्या उद्देशाने हे मराठा शौर्य स्मारक होत आहे, असेही मंत्री रावल यांनी सांगितले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/