यवतमाळ, दि.15 (जिमाका) : राळेगाव तालुक्यात रेतीअभावी घरकुल बांधकामाचा प्रश्न निर्माण झाला आहे, केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी घरकुल योजनेद्वारे घरे मंजूर झाले मात्र रेती उपलब्ध होत नसल्याने बांधकामे थांबली आहेत. घरकुलांना गती देण्यासाठी रेती उपलब्ध करून द्या, अशा सूचना आदिवासी विकास मंत्री प्रा.डॅा.अशोक उईके यांनी केल्या.
आदिवासी विकासमंत्री यांनी तहसील कार्यालय राळेगाव येथे विविध महत्वपूर्ण विषयांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला राळेगाव तहसिलदार अमित भोईटे, गटविकास अधिकारी केशव पवार, उपअधीक्षक भूमी अभिलेख श्री.गवई, तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी, पोलीस निरीक्षक सिताराम मेहत्रे, चित्तरंजन कोल्हे, डॉ. कुणाल भोयर, प्रशांत तायडे यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
रेतीअभावी गोर-गरिबांच्या घरकुलांचे बांधकाम थांबता कामा नये. त्याकरीता आवश्यक प्रयत्न करा परंतू घरांची कामे नियमित सुरु राहिली पाहिजे. शासनाने स्वत:चे पक्के घर नसणाऱ्या लाभार्थ्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरीता निधी उपलब्ध करून दिला. राहते घर पडले आणि नवीन घराच्या बांधकाम करीता रेती मिळत नाही. त्यामुळे काही लाभार्थी कुटुंबाचा राहण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. लाभार्थ्यांची ही अडचण आपण समजून घेतली पाहिजे. शासन प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे, प्रशासनाने त्या दिशेने काम केले पाहिजे, असे प्रा.उईके म्हणाले.
शेतकरी, कष्टकरी, महिला व सर्व समाज घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. प्रशासनाने देखील कार्यक्षम आणि संवेदनशीलपणे काम केले, असे ते म्हणाले. घरासाठी रेती उपलब्ध होत नसल्याने अनेक लाभार्थी रेती उपलब्ध करून देण्याची मागणी करत होते. त्याअनुषंगाने रेतीचा विषय प्राधान्याने घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
घरकुलांसोबतच राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, राळेगाव नगरपरिषद क्षेत्रात घरकुलांसाठी अतिक्रमण नियमानुकूल करणे, पाणी टंचाई, विविध विकास कामे आदी विषयांवर देखील त्यांनी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांच्याहस्ते तालुक्यातील 15 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी एक लक्ष रुपयांच्या मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून काही मदत देता येतील का? यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. बैठकीला संबंधित विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.