कामठीचा वाढता विस्तार लक्षात घेता स्वतंत्र उपायुक्त कार्यालय उभारणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि. १५ : कामठी शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असून या विस्ताराला योग्य सुरक्षा व दिशा देण्याच्या दृष्टीने अद्ययावत सर्व सुविधापूर्ण स्वतंत्र पोलिस उपायुक्त कार्यालय उभारले जाणार आहे. या कार्यालयात कामठीतील सर्व सीसीटीव्ही कॅमे-याचे कंट्रोल रूम, वॅार रूम, एसीपी कार्यालय, पोलिस स्थानक, पार्किंगच्या सुविधेसह आदर्श ठरेल या पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे कामठी मेट्रो फेज २ विस्ताराच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी नियोजन संचालक अनिल कोकाटे, मेट्रोचे प्रकल्प संचालक राजीव त्यागी, पोलिस उपायुक्त नचिकेत कदम, उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नवीन कामठी पोलिस मेट्रो स्टेशनच्या प्रस्तावाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

तळमजला अधिक दोन मजले अशा स्वरूपात नवीन पोलिस उपायुक्त कार्यालय उभारले जाईल. याच्या निधीबाबत मेट्रोच्या निकषानुसार उपलब्धता करून देण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी मेट्रोला दिले. प्रस्तावित कन्हान मेट्रो विस्तारीकरणाबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

कन्हान येथे मेट्रो स्टेशननजीक उभारले जाणार दहा मजली व्यापारी संकुल

कन्हान येथे प्रस्तावित मेट्रो प्रकल्पासाठी कामठी नगरपरिषदेच्या जागेचा योग्य विनियोग व्हावा व स्थानिक व्यापा-यांना व्यवसायासाठी संधी उपलब्ध व्हावी या दृष्टीने हे मेट्रो स्टेशनच्या बाजुला बाजुला एकत्र व्यावसायिक संकुल उभारण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्याचे निर्देश या बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. हे व्यापारी संकुल दहा मजली असावे. यात दोन मजले हे पार्किंगसाठी, एक मजला आटोमोबाईल सेक्टर, दुसरा मजला कापड बाजारपेठ, भाजीपाला मार्केटसाठी स्वतंत्र मजला यासह इतर व्यावसायांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे ते म्हणाले. या व्यापारी संकुलाच्या आराखड्यात सर्व बाबींचा विचार व्हावा असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक तालुक्यात बांधकाम कामगारांसाठी होणार सुरक्षा किट वाटप शिबीर

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईत अंतर्गत कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध आहे. प्रत्येक कामगारांना कामाच्या ठिकाणी सुरक्षा किट असावे, त्यांच्या रोजच्या उपजीविकेसाठी लागणारी आवश्यक भांडे मिळावे यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. यात एकाच ठिकाणी शिबिर आयोजित केल्यास पात्र व अपात्र लाभार्थ्यांमध्ये शंकेचे वातावरण निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेता ख-या पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाची ही योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पातळीवर किमान तीन दिवसाचे शिबिर आयोजित करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामगार विभागाला दिले.

प्रत्येक पात्र कामगारांना वाटपापूर्वी संपर्क साधून त्यांना वेळ व दिनांक मेसेजद्वारे कळविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत भूमी अभिलेख विभागाचा आढावा घेण्यात आला.

अनेक लोकांच्या जमिन मोजणीबात तक्रारी आहेत. या तक्रारीचे तत्काळ निवारण व्हावे यादृष्टीने भूमी अभिलेख कार्यालयाद्वारे याचे एक निश्चित वेळापत्रक करून तालुकानिहाय मोजणी मोहीम हाती घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.