कोल्हापूर (जिमाका) दि : 15 मौजे सांगरूळच्या ग्रामस्थांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. सांगरूळ गायरान जमिनीच्या अनुषंगाने शासनस्तरावर आढावा घेवून सामोपचाराने निश्चितपणाने तोडगा काढू, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात मौजे सांगरूळ गायरान प्रश्नाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, कृषी अधीक्षक जालिंदर पांगारे, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अरुण जाधव, करवीर प्रांताधिकारी हरीश धार्मिक, करवीर गटविकास अधिकारी श्रीमती दिपाली पाटील, गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे, सांगरूळच्या सरपंच श्रीमती शितल खाडे आदी उपस्थित होते.
वनहक्क अधिनिनियमातील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीने नागरी सुविधा करिता जागा मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे त्वरीत सादर करावा, अशी सूचनाही पालकमंत्री आबिटकर यांनी या बैठकीत केली. तसेच हा प्रश्न केवळ सांगरूळ गावाचा नाही तर जिल्ह्यातील इतर गावांबाबतही अशा प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी याप्रसंगी दिली. जिल्हा प्रशासनाकडून याप्रश्नी सांगरूळ ग्रामस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले.
79.9 हेक्टर इतक्या गायरान जमिनीबाबत हा प्रश्न उपस्थित होत आहे. वन विभागाच्यावतीनेही या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद म्हणाले. या बैठकीसाठी मौजे सांगरूळचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
महामार्गावरील स्थानिक समस्यांचे निवारण करून बालिंगा पुलाचे काम करावे – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
गगनबावडा मार्गावर असणाऱ्या बालिंगा ते दोनवडे या दोन गावांमध्ये पंचगंगा नदीवरील प्रस्तावित पुलाच्या दोन्ही बाजूच्या भरावामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने या महामार्गावरील स्थानिकांच्या समस्यांचे निवारण करून बालिंगा पुलाचे काम करावे तसेच पावसाळ्यात या परिसरातील लोकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी, अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात या पुलाच्या आढाव्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अमोल येडगे , नॅशनल हायवेचे अधीक्षक अभियंता दयानंद विभुते, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, नॅशनल हायवेच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक तर दूरदृष्टीप्रणालीद्वारे संतोष शेलार आदी उपस्थित होते. या पूल उभारणीच्या अनुषंगाने तांत्रिक तज्ज्ञांनी येत्या दोन दिवसात प्रत्यक्ष कार्यस्थळी भेट द्यावी अशी सूचना करून आबिटकर म्हणाले, पावसाळ्यात या प्रस्तावित पुलाच्या उभारणीच्या अनुषंगाने लोकांना कोणतीही अडचण येऊ नये. त्यांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागू नये. तर या पुलाच्या संदर्भात महाराष्ट्रातील नामांकित डिझायनर घेऊन या पुलाच्या उभारणी संदर्भात सर्वमान्य कालबद्ध तोडगा काढावा, अशी सूचना आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. या पुलाचा आढावा घेण्यासंदर्भात पुढील शनिवारी बैठक घेवू असे जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले. या बैठकीसाठी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्यासह बालिंगा व परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते