सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : येत्या काळात गोरगरीबांना, गरजूंना आणखी स्वस्तात घरे मिळण्यासाठी, त्यांच्या कर्जाचा भार कमी करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.
मिरज शहरातील समतानगर येथे गोखले इन्फ्राडेव्हलपर्स प्रा. लि. व सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या सार्वजनिक खाजगी भागीदारीतील परवडणाऱ्या भीमपलास गृहप्रकल्पातील सदनिकांचे हस्तांतरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, दिपक शिंदे, समित कदम, विनायक गोखले, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, यांच्यासह अधिकारी, महापालिकेचे माजी पदाधिकारी उपस्थित होते.
देखणी इमारत उभी करून गोरगरीबांच्या स्वप्नातील चांगली घरे निर्माण केल्याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गोरगरीबांचे उत्पन्न वाढविण्यासाठी, त्यांच्या खर्चाचा भार उचलून त्यांना दारिद्र्य रेषेच्यावर आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक योजना राबवून प्रयत्न करीत आहेत. मोफत शौचालय, उज्ज्वला गॅस योजना, मोफत धान्य वाटप, प्रत्येक घरी थेट नळाने पाणी, लखपती दीदी, शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून वार्षिक 6 हजार रूपये, पाच लाख रूपये पर्यंतचे मोफत उपचार, अशा अनेक योजना राबवून गोरगरीबांना त्यांच्या आर्थिक स्थितीतून वर आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या शतकापर्यंत म्हणजेच २०४७ पर्यंत देशाला जगामध्ये अग्रस्थानी ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. यासाठी प्रामाणिकपणे काम करू, व्यसनापासून दूर राहू, शिक्षणाचे प्रमाण वाढवू, मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढवू, असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी मनोगत व्यक्त करताना या गृह प्रकल्पातून एक देखणी इमारत उभी राहिली असल्याचे सांगून प्रधानमंत्री आवास योजना ही गोरगरीबांच्या आयुष्यात परिवर्तन करणारी योजना आहे. या ठिकाणी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगून लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फीत कापून प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना चावी देण्यात आली.
यावेळी लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या स्वप्नातील घर पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
या प्रकल्पामधील एकूण 160 सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर आहेत. प्रति लाभार्थी राज्य शासन एक लाख रूपये आणि केंद्र शासन एक लाख 50 हजार असे एकूण प्रति लाभार्थी 2 लाख 50 हजार रूपये याप्रमाणे एकूण 4 कोटी रूपये इतके अनुदान मंजूर आहे. पैकी राज्य शासनाचे पहिले दोन हप्त्यांचे अनुदान एकूण 1 कोटी 24 लाख रूपये वितरित करण्यात आले असून, अंतिम हप्त्याचे एकूण 36 लाख रूपये अनुदान सदनिका हस्तांतरीत केल्यानंतर प्राप्त होणार आहे.
केंद्र शासनाच्या पहिल्या दोन हप्त्यांप्रतीचे अनुदान एकूण 1 कोटी 86 लाख रूपये वितरीत करण्यात आले आहेत. अंतिम हप्त्याचे एकूण 54 लाख रूपये अनुदान सदनिका हस्तांतरीत केल्यानंतर प्राप्त होणार आहे. याशिवाय, कामगार कल्याण महामंडळअंतर्गत अटल बांधकाम कामगारांच्या घरकुलाकरिता 2 लाख रूपये प्रति लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधी व्यतिरिक्त दिले जातात. यासाठी 144 बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. यापैकी मंजूर 62 लाभार्थींना पहिल्या दोन हप्त्यांचे अनुदान एकूण 99 लाख 20 हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. 37 नवीन लाभार्थींना अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून मंजुरी मिळालेली आहे. भीमपलास टॉवर हे निवासी संकुल असून त्यामध्ये दोन विंग आहेत. या दोन्ही इमारती प्रत्येकी 6 मजल्याच्या आहेत.
स्वागत व प्रास्ताविक विनायक गोखले यांनी केले. सूत्रसंचालन वैष्णवी जाधव यांनी केले. आभार ऋषिकेश गोखले यांनी मानले.
कार्यक्रमास शासकीय अधिकारी, यांच्यासह लाभार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.