मुंबई, दि.6 : स्थळ : मंत्रालयाचे प्रवेशद्वार; सकाळचे पावणेदहा वाजलेले, मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांचे गुलाबाचे फूल आणि शुभेच्छापत्राने स्वागत होत होते. उत्सुकतेने, पत्र वाचताच सगळयांना सुखद अनुभव मिळाला. कारण पत्र लिहिले होते मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी. निमित्त ठरले, रविवारी साजरा होणारा जागतिक महिला दिवस. या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील सर्व महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात महत्चाचे योगदान देत असल्याबद्दल आभार मानले.
मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे शुभेच्छापत्रात म्हणतात की, ”आपल्या महाराष्ट्रात राजमाता जिजाबाई, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, आनंदी गोपाळ अशा अनेक थोर महिलांच्या कर्तृत्वाचा सुवर्णमय इतिहास आहे आणि नाविन्यपूर्ण काम करण्यासाठी हा इतिहास सदैव आपल्याला प्रेरित करीत असतो. आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनात मुलगी, पत्नी, आई अशा सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच, मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी मोलाचे योगदान देत असता. तुमच्या सहकार्यामुळेच आपण महाराष्ट्राच्या जनतेसाठी घेतलेल्या निर्णयाची यशस्वीपणे अंमलबजावणी करु शकतो. या योगदानासाठी आज महिला दिनाच्या निमित्ताने मी तुमचे आभार व्यक्त करतो.” |
मंत्रालयातील आरसा गेट, मेन गेट, गार्डन गेट या प्रवेशद्वारावर आज सकळापासूनच वातावरण भारावून गेले होते. स्वागत करण्यासाठी उत्सुक महिला- पुरुषांची लगबग सुरु होती. मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना अत्यंत आपुलकीने आणि आदराने गुलाबपुष्प आणि शुभेच्छा पत्र देण्यात येत होते. या अनोख्या स्वागताने समस्त महिला वर्ग मनापासून भारावून गेला आणि आनंदित झाला होता.
मंत्रालयाच्या इतिहासात अशी घटना प्रथमच घडली असावी. मुख्यमंत्र्यांची महिलांप्रती असलेली संवेदनशीलता आणि आपुलकीने सर्व महिला भारावून गेल्या. या भारावलेल्या अवस्थेतच मंत्रालयात प्रवेश केल्यावर परिचित आणि सहकाऱ्यांना हे शुभेच्छापत्र आणि गुलाबाचे फूल दाखवत होत्या. काही महिलांनी मुख्यमंत्र्यांचे शुभेच्छा पत्र आणि फुलाचा स्मार्टफोनवर फोटो काढून आपल्या घरच्यांना, परिचितांना पाठवण्यास सुरुवात केली. काही क्षणातच हे पत्र, फूल आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शुभेच्छांच्या पोस्टस सोशल मीडियावर शेअर व्हायला सुरुवात झाली. एकूणच मंत्रालयातील महिलांसाठी आजचा दिवस अविस्मरणीय ठरला.
००००
वर्षा आंधळे/विसंअ/6 मार्च 2020