सौर उर्जा प्रकल्पामुळे दूध उत्पादक सभासदांना फायदा – मंत्री हसन मुश्रीफ

सहकारी संस्थेचा देशातील पहिला सौर उर्जा प्रकल्प करमाळ्यात; गोकुळ सहकारी दुध संघाच्या माध्यमातून प्रकल्प उभारणी

सोलापूर, दि. १६: देशातील सहकारी संस्थेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प मौजे लिंबेवाडी (ता. करमाळा) येथे सुरू करण्यात आला आहे.  गोकुळ दुध संघाचा वीजेवर होणारा खर्च कमी करण्यासाठी या सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 33 कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पातून दैनंदिन  साडेसहा मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. या वीज निर्मितीमधून गोकुळ दूध संघाची दर महिन्याकाठी सुमारे 50 लाख रुपयांच्या विजेची बचत होणार असून, भविष्यात याचा लाभ थेट गोकुळच्या सभासदांना होणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.कोल्हापूर (गोकुळ) यांचा ओपन ॲक्सेस स्कीम अंतर्गत 6.5 मे. वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प लिंबेवाडी येथे स्वमालकीच्या १८ एकर जागेवर कार्यान्वित करण्यात आला असून, दूध संघाच्या 62 व्या वर्धापनदिनानिमित्त या प्रकल्पाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार नारायण आबा पाटील, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले व गोकुळचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

 

यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले की, यापूर्वी सूर्यापासून सौर प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, आधुनिक तंत्रज्ञान वापरात नव्हते. परंतु, आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सौर ऊर्जाचे अत्याधुनिक पॅनल निघाले आहेत. त्यामुळे विविध क्षेत्रासाठी लागणाऱ्या वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूर्यघर योजना जाहीर केली आहे. तसेच राज्य शासनानेही सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतला असून शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना शेत पंपासाठी दिवसा वीज पुरवठा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.

गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून मौजे लिंबेवाडी येथे ॲक्सेस स्कीम अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प देशातील पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी 33 कोटींची गुंतवणूक केली असून वर्षाला ६ कोटी रुपये आर्थिक बचत होणार आहे. या प्रकल्पासाठी गोकुळ दूध संघाने मोठी गुंतवणूक केली असून तीन वर्षांनंतर हा प्रकल्प कर्जमुक्त होणार आहे. सूर्य हा भारत देशासाठी खजिना आहे. आगामी काळात सौरऊर्जेचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होणार आहे.अनेक वाहने सौरऊर्जेवर चालतील असे नवे तंत्रज्ञान येणार आहे. त्यामुळे भविष्यात पेट्रोल डिझेल इंधनावरील ताण कमी होईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की,  रिटेवाडी उपसासिंचन या भागात कार्यन्वित केल्यास या भागातील बराचसा भाग हा बागायत क्षेत्राखाली येणार आहे. तसेच हा भाग जर बागायती क्षेत्राखाली आला तर येथे होणारे स्थलांतर हे मोठ्या प्रमाणात रोखले जाणार असून रिटेवाडी उपसा सिंचन योजना कार्यन्वित करावी, अशी त्यांनी यावेळी मागणी केली. तसेच याभागात गोकुळ सौरउर्जा प्रकल्प आणल्याबाबत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे आभार मानले.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, हा सौर ऊर्जेचा प्रकल्प करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी गावामध्ये 18 एकर माळरान जमिनीवर पुणे येथील एका खासगी कंपनीच्या सहकार्यातून उभा केला आहे. येथे तयार झालेली वीज महावितरण कंपनीला देण्यात आली आहे. यासाठी सुमारे 18 किलोमीटर पर्यंतची वीज जोडणी स्वत: दूध संघाने केली आहे. आतापर्यंत दूध आणि त्या पासून बनणारे पदार्थ यांच्या विक्री आणि नफ्यातून गोकुळने प्रगती केली आहे. आता सौर ऊर्जा प्रकल्प करणारी गोकुळ ही देशातील पहिली सहकारी संस्था बनली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

०००