मुंबई, दि. १८: राज्यातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील संचमान्यता करून नोकर भरती सुरू करण्याच्या अनुषंगाने सविस्तर तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांनी दिले.
अनुदानित आदिवासी आश्रमशाळांच्या अडचणीसंदर्भात आश्रमशाळांच्या संस्थाचालकांनी आदिवासी विकास मंत्री उईके यांची भेट घेऊन संवाद साधला. त्यावेळी मंत्री उईके बोलत होते. यावेळी आमदार संजय पुरम, बाळासाहेब मांगुडकर, माजी आमदार अपूर्व हिरे, वैभव पिचड, आनंद ठाकूर, शिवराम झोले, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्यासह अनुदानित आदिवासी आश्रम शाळा संघटनेचे पदाधिकारी व संस्थाचालक उपस्थित होते.

अनुदानित आदिवासी आश्रमशाळांना देण्यात येणारे अनुदान विद्यार्थी संख्येनुसार देण्यात यावे. अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षक भरती पुन्हा सुरू करावी. टप्प्या टप्प्याने देण्यात येणारे अनुदान वेळेत देण्यात यावे. संच मान्यता असलेल्या व पदे मंजूर असलेल्या ठिकाणी शिक्षकांना मान्यता मिळावी, अशा विविध मागण्यांवर यावेळी चर्चा झाली.
आदिवासी विकास मंत्री उईके म्हणाले की, आदिवासी विकास विभाग आणि अनुदानित आश्रमशाळा हे एक कुटुंब आहे. या दोघांनी एकत्र येऊन आदिवासी आश्रम शाळांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. अनुदानित आदिवासी आश्रम शाळा या दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करतात. हे विद्यार्थी मुख्य प्रवाहात यावे, यासाठी त्यांचे योगदान आहे. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. शिक्षक भरतीसंदर्भात विभागाने तपासणी करून अहवाल सादर करावा. आकस्मिक खर्चाचे अनुदानाचे टप्पे वेळेत देण्यात यावेत.
संस्थाचालकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील. संस्था चालकांना न्याय देऊ, असेही मंत्री उईके यांनी सांगितले.
अनुदानित आदिवासी आश्रम शाळांमधील संच मान्यता करून शिक्षक भरती तातडीने सुरू करावी, अनुदानाचे टप्पे वेळेत द्यावेत आदी मागण्यांचे निवेदन संस्थाचालकांनी यावेळी सादर केले.
०००