युक्रेन कॉन्सुलेटमुळे दोन्ही देशातील भागीदारी वृद्धिंगत होईल – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. १९: भारत आणि युक्रेन यांच्यातील द्विपक्षीय व्यापारामुळे यापूर्वीच मजबूत पायाभूत संरचना निर्माण झाली असून आता या नव्या वाणिज्य दूतावासाच्या (युक्रेन कॉन्सुलेट) उद्घाटनामुळे दोन्ही देशातील व्यापारिक संबंध आणि भागीदारी वृद्धिंगत होणार आहे, असा विश्वास राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी युक्रेन कॉन्सुलेट उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.

वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे युक्रेन कॉन्सुलेट उद्घाटनप्रसंगी मंत्री रावल बोलत होते. यावेळी युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आंद्रिय सिबिहा, भारतातील युक्रेन दूतावासाचे राजदूत डॉ. अलेक्झांडर पोलिशचुक, मुंबई वर्ल्ड ट्रेड सेंटर, एमव्हीआयआरडीसी आणि अखिल भारतीय उद्योग संघटनेचे अध्यक्ष विजय कलंत्री यांच्यासह वाणिज्यदूत उपस्थित होते.

मंत्री रावल म्हणाले की, देशाच्या मजबूत आर्थिक वाटचालीमुळे, आपला देश असामान्य प्रगतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. भारत ही जगातील एक तरुण, उत्साही आणि ऊर्जावान लोकशाही आहे. ज्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था प्रत्येक क्षेत्रात नवकल्पना, उद्योजकता आणि डिजिटल परिवर्तनात पुढाकार घेत आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीच्या प्रवासात मुंबईची भूमिका महत्त्वाची असून त्यामुळेच अनेक देश आपल्या राजनैतिक उपस्थितीची सुरुवात येथे करत आहेत. जागतिक आर्थिक प्रभावाचे प्रतिक असलेल्या मुंबईत युक्रेन वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन झाल्यामुळे दोन्ही देशांतील आर्थिक संबंध बळकट होण्यासोबतच सांस्कृतिक आणि लोकांमधील परस्पर संबंध वाढण्यासही हातभार लागेल, असेही मंत्री रावल यांनी सांगितले.

युक्रेन सध्या जरी युद्धग्रस्त देश असला तरी, आंतरराष्ट्रीय भागीदारी मजबूत करण्यास आणि विकासाच्या नवीन संधी शोधण्यास तत्पर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नमूद केल्यानुसार “भारत तटस्थ नाही; भारत हा शांतीच्या बाजूने आहे.” या भावनेला अनुसरून, आम्ही मनःपूर्वक प्रार्थना करतो की संपूर्ण प्रदेशात आणि जगभरात शांती नांदो, जेणेकरून आपली भागीदारी आणखी वृद्धिंगत होईल आणि पुढील पिढ्यांसाठी समृद्धी निर्माण होईल, असेही मंत्री रावल यांनी सांगितले.

युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आंद्रिय सिबिहा म्हणाले, मुंबईसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आमचे वाणिज्य दूतावास उघडणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. हा केवळ राजनैतिक निर्णय नाही, तर भारत आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे याचे प्रतिक आहे. भारताचे जागतिक पातळीवरील स्थान असामान्य असून या भागीदारीतून मोठी प्रगती होईल. कोणत्याही देशाचा राजनैतिक विस्तार हा द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल असते. ऐतिहासिकदृष्ट्या युक्रेन आणि भारत यांचे जवळचे संबंध असून ते संबंध पुढे नेण्यास युक्रेन तयार आहे. शांतता प्रक्रियेत भारताची भूमिका महत्वाची असून त्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंधांना बळकटी देण्यासाठी देखील हे वाणिज्य दूतावास महत्वाचा ठरणार आहे, असे मत सिबिहा यांनी व्यक्त केले.

०००

अर्चना देशमुख/विसंअ