- नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा समृद्ध होईल
- एअर न्यूझीलंड व एअर इंडिया यांच्यात कोडशेअर भागीदारी
- २०२८ ला भारत व न्यूझीलंड थेट विमानसेवा सुरू होणार
मुंबई, दि.१९: न्यूझीलंडची अर्थव्यवस्था पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील परस्पर संबंध वाढून पर्यटन वाढावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.पर्यटनामुळे रोजगारनिर्मिती होते. तसेच नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा समृद्ध होतो आणि देशाची प्रतिमा जागतिकस्तरावर उंचावते. न्यूझीलंडमध्ये पर्यटन संधी वाढवून येथील संस्कृतीची माहिती जागतिक पातळीवर पोहचवण्याचा उद्देश असल्याचा न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सेन यांनी सांगितले.
लक्सेन तसेच त्यांच्यासह आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळ यांच्या उपस्थितीत हॉटेल ताज येथे पर्यटनविषयक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
स्टार अलायन्सच्या भागीदार एअर न्यूझीलंड आणि एअर इंडिया यांनी भारत-न्यूझीलँड हवाई संपर्क वाढवण्यासाठी सामंजस्य करार (MoU) केला आहे. हा करार न्यूझीलंडचे ख्रिस्तोफर लक्सेन यांच्या उपस्थितीत हॉटेल ताज येथे करण्यात आला. या करारामुळे भारत आणि न्यूझीलंड अशी थेट विमानसेवा 2028 मध्ये सुरू होईल.
पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सेन म्हणाले की, न्यूझीलंडमधील पर्यटन वाढीसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. आमचा विश्वास आहे की पर्यटनाचे देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान असले पाहिजे. नवीन कोडशेअर भागीदारीमुळे १६ मार्गांवर कोडशेअर सेवा उपलब्ध होणार, ज्यामुळे भारत, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दरम्यान अधिक पर्याय आणि सोयीस्कर प्रवास शक्य होईल. प्रवासी आता दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईहून एअर इंडियाने प्रवास करून सिडनी, मेलबर्न किंवा सिंगापूर येथे एअर न्यूझीलंडच्या विमानांमध्ये बदल करू शकतील आणि ऑकलंड, ख्राईस्टचर्च, वेलिंग्टन आणि क्विन्सटाउन येथे जाऊ शकतील.
पंतप्रधान लक्सेन म्हणाले की, एअर न्यूझीलंड आणि एअर इंडिया २०२८ पर्यंत भारत आणि न्यूझीलंड दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याच्या शक्यतांचा अभ्यास करणार आहेत. यासाठी नवीन विमानांची उपलब्धता आणि संबंधित मंजूरी आवश्यक असेल.
एअर न्यूझीलंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग फोरान म्हणाले की, कोडशेअर करार हे पहिलं पाऊल असून, भविष्यात थेट सेवा कशी असू शकते, यावर आम्ही काम करत आहोत. यामुळे पर्यटन, व्यापार आणि शिक्षण क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये संबंध मजबूत होतील.”
एअर इंडिया व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले. “एअर इंडिया आपल्या जागतिक नेटवर्कचा विस्तार करत आहे. एअर न्यूझीलँडसोबतच्या नवीन भागीदारीमुळे भारत- न्यूझीलंड प्रवास अधिक सुलभ होईल आणि भविष्यात थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रवासी संख्या वाढवण्यास मदत होईल. न्यूझीलंडच्या पर्यटन विभागाच्या माहितीनुसार२०२४ मध्ये ८०,००० हून अधिक भारतीय पर्यटक न्यूझीलंडला गेले, जी २०१९ पेक्षा २३% जास्त वाढ आहे.भारतीय प्रवासी सहसा ऑफ-पीक (हंगामाबाहेरील) कालावधीत प्रवास करतात, ज्यामुळे न्यूझीलंडच्या पर्यटनाला संधी उपलब्ध होईल. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले.
०००
संध्या गरवारे/विसंअ