विधानसभा लक्षवेधी

धुळे शहरातील देवपूर उपनगरातील जागा अतिक्रमणमुक्त करणार  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २० : धुळे शहरातील देवपूर उपनगरात वीट भट्टी परिसरात जागेवरील अतिक्रमणाबाबत धुळे महानगरपालिका व महसूल प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाहीतून कालबद्धरित्या अतिक्रमण काढण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

धुळे शहरातील देवपूर उपनगरातील अतिक्रमित जागेबाबत सदस्य अनुपभैय्या अग्रवाल यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

या सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, ही जागा १९५१- ५२ मध्ये कारागृहाकडे होती. मात्र २ जानेवारी १९६० रोजी ही ६.१४ हेक्टर जागा कारागृहाकडून महसूल विभागाकडे आली. या भागात नदी – नाल्याची पूर रेषा आहे. पूररेषेच्या आत ५.३२ हेक्टर आणि पूररेषेच्या बाहेर ०.८२ हेक्टर क्षेत्र आहे. या क्षेत्रावर १४६ अतिक्रमणे असून त्यापैकी २४ पक्की घरे आहेत. या क्षेत्रावर २०११ पूर्वीची अतिक्रमणे असल्यामुळे त्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

पूररेषेच्या आत असलेल्या ५.३२ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमणे काढण्यासाठी धुळे महानगरपालिका आणि महसूल प्रशासन यांच्यात बैठक झाली आहे. बैठकीतील निर्णयानुसार कालबद्ध कार्यक्रम आखून ही जागा अतिक्रमणमुक्त करण्यात येईल, असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

0000

शैलजापाटील/विसंअ

 नेवासा तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पबाधित गावांसाठी ४६ कोटींचा निधी  मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई, दि. 20 : जायकवाडी प्रकल्प अंतर्गत नेवासा तालुक्यातील प्रकल्प बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरविण्याकरिता 46 कोटी 10 लाख 37 हजार 142 निधी उपलब्ध करून दिला असून उर्वरित नागरी सुविधांची अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यतेकरिता विभागीय आयुक्त नाशिक कार्यालयामार्फत सादर करण्यात आली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य विठ्ठल लंघे यांनी ही  लक्षवेधी सूचना मांडली. यावेळी मोनिका राजळे यांनी सहभाग घेतला.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले, सन १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पात बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरविण्याकरिता नुकतीच मंत्री मंडळ बैठकीत मान्यता दिली आहे.  १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पांमुळे पुनर्वसन झालेल्या गावठाणांमध्ये अपूर्ण नागरी सुविधा पुरवण्यासाठी कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

0000

शैलजा पाटील/विसंअ

 

 

शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मुंबई, २० :- शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त होताच नियमानुसार कारवाई केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

या लक्षवेधीच्या उत्तराच्या वेळी अधिक माहिती देताना मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले, या महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत असलेल्या डॉ. फहिम जहांगीर सय्यद यांना २५ लाख इतका घर बांधणी अग्रिम मंजूर करण्यात आले होता. डॉक्टर सय्यद या सेवेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याने शासन नियमानुसार त्यांच्या घरबांधणी  अग्रीमावरील व्याजाची रुपये ८ लाख ४९ हजार २३ रुपये इतकी रक्कम क्षमापित करण्यात मान्यता देण्यात आली. तसेच त्यांना मंजूर करण्यात आलेल्या आक्रम पैकी शिल्लक मुद्दल ९ लाख ६  हजार २५० रुपये त्यांना ते असलेल्या मृत्यु-नि-सेवा उत्पादनातून वसूल करण्यात आले. मात्र या महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य यांनी डॉ. सय्यद यांच्या मुद्दल व व्याजाची रक्कम असे १७ लाख ५५ हजार २७३ इतकी रक्कम त्यांच्या वारसा कडून धनादेशद्वारे मागणे हे नियमबाह्य आहे. याबाबत डॉ. सय्यद यांच्या वारसांनी न्यायालयात दाद मागितली.  न्यायालयाच्या आदेशानुसार, कॉलेज प्रशासनाने हे पैसे डॉ. सय्यद यांच्या वारसांना परत करणे आवश्यक आहे.  डॉ. सय्यद यांच्या वारसा वसूल करण्यात आलेली रक्कम  प्रकरणासंदर्भात तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणे यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे.

तसेच महाविद्यालयाच्या ताब्यात असणारी जागे संदर्भातही आपण स्वतः लक्ष घालून हा विषय मार्गी लावला जाईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री पाटील यांनी सांगितले. या संदर्भात सदस्य महेश शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती.

०००००

एकनाथ पोवार/वि.सं.अ/

वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट- सप्टेंबर २०२४ कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी ७३.८७ कोटी निधी मंजूर – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई, दि. २० :- वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ या  कालावधीत अतिवृष्टीमुळे ६५ हजार ४८४ शेतकऱ्यांच्या ५३,८३५.३२ हेक्टर क्षेत्रावरील झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी ७३.८७ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानसभेत दिली.या संदर्भात सदस्य सई डहाके यांनी लक्षवेधी उपस्थीत केली होती.

मंत्री श्री. जाधव-पाटील  यांनी सांगितले, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी  शासन त्यांच्या पाठीशी शासन नेहमीच खंबीरपणे उभे राहते.  नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जिरायती पिकाच्या नुकसानीसाठी रुपये १३ हजार ६०० प्रति हेक्टर, बागायती पिकाच्या नुकसानीसाठी रुपये २७००० प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी रूप ३६००० प्रति हेक्टर मदत देण्यात येते. तसेच ही मदत केंद्र शासनाच्या दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेत वाढवण्यात आली असल्याचे मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.

मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले, वाशिम जिल्ह्यासाठी फेब्रुवारी मार्च व एप्रिल २०२४ कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना १४.१५ कोटी इतका निधी प्रत्यक्षात वितरित केला आहे. मे २०२४ या मध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी ७.१३ लक्ष इतका निधी शेतकऱ्यांना वितरीत केला आहे. तर जून- जुलै २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या  शेत पिकांच्या नुकसानीपोटी ६९.५४ लक्ष इतका निधी शेतकऱ्यांना वितरीत केला आहे.

0000

एकनाथ पोवार/वि.सं.अ/

गोंड राजे बख्त बुलंद शाह समाधी स्थळ सुशोभीकरणासाठी नागपूर सुधार प्रन्यासने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २० :-  गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या समाधी स्थळाचे सुशोभीकरण सुधारण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी ९ कोटी ७२ लाखाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी नागपूर सुधार प्रन्यास ने (NIT) हा निधी तात्काळ मंजूर करावा, असे निर्देश देण्यात आले असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तराच्या वेळी दिले.

सदस्य भीमराम केराम यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य प्रवीण दटके यांनीही सहभाग घेतला.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले, गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या समाधी स्थळी कोणतेही अतिक्रमण नाही. मात्र सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा विचार करून, जर अतिक्रमण  असेल तर ते तत्काळ हटवण्याचे आदेश दिले जातील, असे उद्योग मंत्री  सामंत यांनी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

 नागपूर महापालिकेतील ऐवजदार सफाई कामगारांच्या नियमितीकरणाबाबतत शासन सकारात्मक – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २० :-  नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत ऐवजदार सफाई कामगारांच्या नियमितीकरण संदर्भात शासन सकारात्मक असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरावेळी सांगितले.

सदस्य प्रवीण दटके यांनी या संदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य मनीषा चौधरी यांनी सहभाग घेतला.

मंत्री उदय सामंत यांनी सांगितले, ऐवजदार सफाई कामगार हा संवर्ग (कॅटेगिरी) फक्त नागपूर महानगरपालिकेतच आहे. यामध्ये २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या ३८३३ पात्र ऐवजदार कर्मचाऱ्यांन अधिसंख्य पदावर सामावून घेण्यात आलेले आहे. २० वर्ष पेक्षा कमी सेवा झालेले ४२९ कर्मचारी ऐवजदार पदावर सध्या कार्यरत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेत सात हजार आपत्कालीन पदांसाठी मंजुरी दिली आहे.  या पदांवर पात्र ऐवजदार सफाई  कर्मचाऱ्यांना घेण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीचे लाभ मिळतील, असेही त्यांनी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

कुकडी उजनी  उपसा सिंचन योजनेत फेरजल नियोजन  अहवाल प्राप्तीनंतर सर्व्हेक्षण मान्यता, निधी उपलब्ध करून देणार – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. २० :-  नियोजित कुकडी उजनी  उपसा सिंचन योजनेमध्ये रिटेवाडी व केल्तूर या उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. कुकडी प्रकल्पाच्या फेरजल नियोजनाबाबतचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर या योजनेच्या सविस्तर सर्व्हेक्षणास मान्यता व आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

कुकडी प्रकल्पतीला लाभक्षेत्रास  प्रकल्प नियोजनानुसार पाणी उपलब्ध करून देण्यात असणाऱ्या अडचणी तसेच प्रकल्पाचे फेर जलनियोजन करून उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र शासनाच्या WAPCOS त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.

करमाळा ( जि. सोलापूर) तालुक्यातील लाभक्षेत्र हे कुकडी डावा कालवा की. मी. २२३ ते २४९ अंतिम भागात असल्याने तालुक्यातील लाभक्षेत्रात पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही मात्र उजनीचे फेर पाणी वाटपानंतर या  ठिकाणी पाणी उपलब्ध होईल,असे जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

सदस्य नारायण पाटील यांनी  करमाळा (जि.सोलापूर) तालुक्यात कुकडी प्रकल्पातून. पाणी मिळावे यासाठी लक्षवेधी उपस्थित केली होती.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/ 

जलनि:स्सारण चर  योजनेसाठी  नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. २० :- मोठ्या व मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात उद्भवणाऱ्या पाणथळ व क्षारयुक्त जमिनीच्या समस्या सोडविण्यासाठी व या क्षेत्राच्या  सुधारण्यासाठी जलनिस्सारण चर  योजनेसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार, असे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

सदस्य डॉ. विश्वजीत कदम यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले की, जलनिस्सारण चर योजना हा कार्यक्रम पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. पाणथळ व क्षारयुक्त जमिनीचे क्षेत्र निश्चित करण्यासाठी विहिरींची पाणीपातळी घेऊन तसेच जमिनींचे माती परीक्षण करून पाणथळ व क्षारपड जमिनी निश्चित करण्यात येते. त्यानुसार क्षारपड, पाणथळ क्षेत्र निर्मूलनासाठी खुल्या चर योजना प्रस्तावित केल्या जातात. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांच्या लाभक्षेत्रामध्ये ७९९ (२८८२.५४ किमी) योजनांची बांधकामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे २ लाख २३ हजार १०५ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे.

कृष्णा कालव्याच्या लाभ क्षेत्रामध्ये कराड, वाळवा, पलूस व तासगाव या चार तालुक्यांचा समावेश आहे. कृष्णा कालव्याच्या लाभक्षेत्रात ३३ खुल्या चर योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. यापैकी पलूस तालुक्यात १८ योजना पूर्ण झाल्या असून त्या  कार्यान्वित आहेत. या १८ चर योजनांमुळे पलूस तालुक्यातील ३ हजार ३१२ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

पुणे जिल्ह्यातील थेरगाव येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार  गृह राज्यमंत्री डॉ पंकज भोयर

मुंबई, दि. २० : पुणे जिल्ह्यातील थेरगाव येथील अनधिकृत बांधकामाबाबत तातडीने चौकशी करण्यात येईल. हे अनधिकृत बांधकाम असल्यास तातडीने निर्देश देऊन काढण्यात येईल,असे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

थेरगाव येथील अनधिकृत बांधकामाबाबत सदस्य अमोल खताळ यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

गृह राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, थेरगाव येथील हा भाग पुणे महापालिकेत येतो. पुणे महापालिकेला कारवाईबाबतचे निर्देश देण्यात येतील. या अनधिकृत बांधकामामुळे या भागात होत असलेल्या बेकायदेशीर वर्तन आणि गैरव्यवहारांवरही कारवाई करण्यात येईल, संगमनेर येथील घटनेची माहिती घेऊन याबाबतही आवश्यक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

००००

निलेश तायडे/विसंअ