मुंबई, दि. २० – उल्लास ॲपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार, दि. २३ मार्च २०२५ रोजी राज्यात ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील या असाक्षर व्यक्तींनी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर सकाळी १० ते सायंकाळी ५ वेळेत स्वतःच्या ओळखपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन बृहन्मुंबई शिक्षणाधिकारी (योजना) डॉ. वैशाली वीर यांनी केले आहे.
प्रत्यक्ष पेपरचा कालावधी तीन तासांचा असून परीक्षार्थी वरील कालावधीत कधीही येऊ शकेल. तर, दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जादा वेळ देण्यात येणार आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात ७,१३५ स्त्री, १०,२७९ पुरुष आणि एक तृतीयपंथी असे एकूण १७,४१५ असाक्षर व्यक्ती या चाचणीसाठी प्रविष्ट होणार असल्याची माहिती डॉ.वीर यांनी दिली आहे.
केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम राज्यात २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत राबविण्यात येत आहे. देशातील १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करून देशातील असाक्षर व्यक्तींमध्ये महत्त्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसित करावयाची आहेत. या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बाल संगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण आदी बाबींचा समावेश आहे.
स्थानिक रोजगार पुनर्कुशलता आणि उच्च कौशल्य प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून प्रौढ नव-साक्षरांसाठी निरंतर शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून देशातील १५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित करता येतील. त्याची अंमलबजावणी केंद्र आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश स्तरावरील संबंधित विभागांच्या साहाय्याने केली जात आहे. महाराष्ट्रात १४ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या निर्णयाद्वारे ही योजना स्वीकारण्यात आली असून त्यानुसार २५ जानेवारी २०२३ च्या निर्णयानुसार या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, गट स्तरीय, शाळास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.
0000