शासकीय कार्यालयांनी जनतेत सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

राज्य शासनाच्या १०० दिवस कृती आराखडा आढावा बैठकीत निर्देश

सांगली, दि.  २० (जिमाका): जिल्ह्यातील सर्व प्रशासनिक विभागांनी सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखद होण्यासाठी प्रयत्न करावेत. सामान्य नागरिकांना शासकीय सेवा वेळेत आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात. शासनाच्या 100 दिवस उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना जनमाणसात शासन व शासकीय कार्यालयांची सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी, असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज येथे दिले.

राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्याच्या सांगली जिल्ह्याच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पारदर्शी कामकाज, नागरिकांना सौहार्दाची वागणूक देत त्यांची प्रकरणे विहित मुदतीत निर्गत करावीत. सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका शासकीय अधिकाऱ्यांची असावी, असे स्पष्ट करून विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, देश आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी जबाबदारीने भूसंपादन करावे. जिल्हा, उपविभाग आणि तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवावा. उद्योगपूरक वातावरण तयार करावे. केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना राबवताना येणाऱ्या अडचणींचे परस्पर समन्वयाने तातडीने निराकरण करावे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शंभर दिवसांच्या कार्यक्रमात प्रत्येक प्रशासकीय विभागाने सक्रिय सहभाग घेऊन सर्वोत्तम कामगिरी बजावावी, असे सांगून डॉ. पुलकुंडवार म्हणाले, शासकीय विभागांनी त्यांचे संकेतस्थळ अद्ययावत करताना त्यावर अचूक माहिती दिली जाईल, याची खात्री करावी. नागरिकांना सुलभ पद्धतीने सेवा उपलब्ध करून देऊन त्यांचे दैनंदिन जीवनमान सुकर करावे. क्षेत्रीय भेटी कायमस्वरूपी देऊन जनतेच्या अडचणींचे निराकरण करावे. प्रशासनाने नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी आणि प्रक्रियेमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा काळजीपू्र्वक वापर करावा. समाजाप्रती जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे. नागरिकांच्या समस्या वेळीच सोडवून त्यांचे जीवनमान सुधारावे, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

राज्य शासनाच्या शंभर दिवस कृती आराखड्यांतर्गत जिल्हा प्रशासन व महसूल विभागाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सादर केला. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच पोलीस विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा व कार्यवाहीची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सादर केली. महानगरपालिकेकडून सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा, ई-ऑफिस व अन्य सोयी सुविधांची माहिती महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सादर केली.

०००