आयरिश सर्जनशीलता आणि नाविन्यता प्रेरणादायी – मंत्री जयकुमार रावल

आयर्लंडचा सेंट पॅट्रिक डे उत्साहात

मुंबई, दि. २० : भारत आणि आयर्लंडमधील मैत्रिपूर्ण संबंध केवळ राजनैतिक भागीदारीवर आधारलेले नाहीत, तर समान मूल्ये, परस्पर सन्मान, आणि सांस्कृतिक व शैक्षणिक प्रेम यावर आधारित आहेत. दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापारात सातत्याने वाढ होत आहे, ज्यामुळे आर्थिक सहकार्याची नवे दालने उघडली जात आहेत. व्यापार, कला आणि शिक्षणाच्या समृद्ध देवाणघेवाण होत आहे. भारतीय विद्यार्थ्यांना आयरिश विद्यापीठांमध्ये स्वागतार्ह वातावरण मिळत आहे. आयरिश देशाची सर्जनशीलता आणि नाविन्यता भारतीयांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

हॉटेल ट्रायडेंट येथे आयर्लंड सेंट पॅट्रिक डे कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मंत्री रावल बोलत होते. यावेळी आयर्लंडचे उच्च शिक्षण मंत्री जेम्स लॉलेस, वाणिज्यदूत केविन कॅली, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, वाणिज्य दूतावासाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

Oplus_131072

आर्यलंडच्या नागरिकांना सेंट पॅट्रिक डे निमित्ताने शुभेच्छा देताना मंत्री रावल म्हणाले की, सेंट पॅट्रिक डे हा फक्त एक सण नाही, तर एक परंपरेचा उत्सव आहे. ही परंपरा साहस, सहानुभूतीची आहे, जी आयर्लंडचे प्रतिनिधित्व करते. सेंट पॅट्रिक डे म्हणजे आयर्लंडच्या समृद्ध वारशाचा, चिरंतन परंपरांचा आणि प्रेमळ लोकसंस्कृतीचा उत्सव आहे. महाराष्ट्र शासन, आयरिश सरकार आणि मुंबईतील वाणिज्य दूतावास यांच्या सहकार्याने नव्या भागीदारीच्या संधी शोधल्या जात आहेत. नवीन क्षेत्रांमध्ये संधी शोधून सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील आहेत.

Oplus_131072

यावेळी आयर्लंडचे उच्च शिक्षण मंत्री जेम्स लॉलेस म्हणाले, हरित रत्न, साहस, आणि आर्यलंडचा गौरवशाली वारसा ही संकल्पना एकत्र साजरी करत आहोत. सेंट पॅट्रिक डे हा उत्सव केवळ आर्यलंड मर्यादित नसून, संपूर्ण जगभर साजरा होणारा उत्सव आहे. गतवर्षी भारत आणि आयर्लंडमधील ७५ वर्षांच्या राजनैतिक संबंधांचा सोहळा साजरा करण्यात आला. 10 जानेवारी 1949 रोजी दोन्ही देशांनी राजनैतिक दूतावासांची देवाणघेवाण करण्याचा निर्णय घेतला होता.

भारत आणि आयर्लंड यांच्यातील संबंध दिवसेंदिवस अधिक दृढ आणि मजबूत होत आहेत. उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी भारतीय विद्यार्थ्यांची आयर्लंड ही पंसती आहे. आगामी वर्षात 12 हजार भारतीय विद्यार्थी आयर्लंडमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणार आहेत. ही आमच्या शिक्षण संस्थांची मोठी विश्वासार्हता आहे. यामुळे भारत हा आयर्लंडसाठी अत्यंत महत्त्वाचा धोरणात्मक भागीदारी बनत आहे. भारतीय-आयरिश संबंध केवळ शिक्षण आणि व्यापारापुरते मर्यादित नाहीत, तर संस्कृती, इतिहास, आणि लोकसंबंधांच्या समृद्ध वारशावर आधारित आहेत. भविष्यातही ही भागीदारी अधिक वृद्धिंगत होईल, आणि आपण संयुक्तपणे नाविन्यपूर्ण प्रकल्प, संशोधन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी नवे क्षितिज खुले करू, असे आयर्लंडचे उच्च शिक्षण मंत्री जेम्स लॉलेस यांनी सांगितले.

०००

गजानन पाटील/स.सं