मुंबई, दि. २०: “बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा” या तत्त्वावर खासगी विकासकांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात धाराशिव येथे भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करावी. याचबरोबरच येरमाळा व उमरगा येथील बसस्थानक देखील विकसित करण्यात यावे. असे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ते विधिमंडळात प्रांगणात धाराशिव जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या संदर्भात बैठकीत बोलत होते. बैठकीला तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील, यांच्यासह एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले, राज्यातील एस. टी. महामंडळाच्या विविध जागा भविष्यात बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर खासगी विकासाच्या मार्फत विकसित करण्यात येणार आहेत. या जागांचे शहरी, निमशहरी व ग्रामीण असे तीन गट तयार केले असून या तीन गटातील प्रत्येकी एक बसस्थानक याप्रमाणे तीन बस स्थानकाचे एक समूह करून त्यासाठी निविदा मागवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यभरातील ६० पेक्षा जास्त बस स्थानकांची निविदा मागवली जाणार असून त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, येरमाळा व उमरगा या बसस्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. सुसज्ज बसस्थानक, प्रसाधनगृह, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह याबरोबरच अद्यावत आगार या आगारामध्ये इलेक्ट्रिक बसेस चार्जिंग स्टेशन, सोलर प्लांट, वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या सुविधा असणार आहेत, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
यासंदर्भातील निविदा प्रक्रिया लवकरच राबविली जाणार असून बसस्थानकाच्या कामाला देखील लगेच सुरुवात केली जाईल, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
०००
संध्या गरवारे/विसंअ