सांगली, दि. २० (जिमाका): कार्यक्षमता आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही काळाची गरज आहे. आपले वैयक्तिक आणि इतरांचे जीवन सुखकर करण्यासाठी निर्माण केलेलं हे एक साधन आहे. या साधनाचा वापर करून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांप्रती सामाजिक उत्तरदायित्व पार पाडावे, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
सांगली जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एआय तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे शासकीय विभागांची उत्पादकता व कार्यक्षमता वृद्धी (एन्हान्सिंग प्रॉडक्टिव्हिटी अँड वर्क एफिशिएन्सी युझिंग एआय) या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. विष्णुदास भावे नाट्यमंदिर येथे आयोजित या कार्यशाळेस जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार आदी उपस्थित होते.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, सामान्य नागरिकांचे जीवनमान सुकर होऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. त्यांना वेळेत, सुकर पद्धतीने शासकीय सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा. शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत शासन, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे, शासकीय कार्यालयांकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टीकोन सकारात्मक पद्धतीने बदलला पाहिजे.
100 दिवस कार्यक्रमाचा एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन केले असले तरी दैनंदिन जीवनात प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक व कार्यालयीन कामकाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करावा. ही काळाची गरज आहे. मानवी बुद्धिमत्तेला अद्याप पर्यंत कोणताही पर्याय निर्माण झालेला नाही, हेही प्रत्येकाने कायम लक्षात ठेवावे. माणसाच्या बुद्धिमत्तेतून निर्माण झालेलं कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक साधन आहे, साध्य नव्हे. त्याचा सुयोग्य वापर करावा. मात्र त्याच्या आहारी जावू नये. कॉपी पेस्ट करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता नाही हे लक्षात ठेवा. प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असून, वेगवेगळ्या कोर्सेसद्वारे आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे. सतत शिक्षण, पुस्तके वाचन आणि प्रशिक्षणावर भर द्यावा, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, शासकीय कामकाजादरम्यान नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापराचे मर्म कळणे आवश्यक आहे. उपलब्ध मनुष्यबळात कार्यभाग साधताना शासकीय विभागांनी कामकाजास अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी. शासकीय विभागांची उत्पादकता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) तंत्रज्ञानाचा वापर उपयुक्त असून, सर्वांनी हे तंत्रज्ञान अवगत करावे. त्यादृष्टीने आजची कार्यशाळा ज्ञान आणि तंत्रज्ञानाने समृद्ध करणारी ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी काकडे यांनी आज येथे व्यक्त केला.
तंत्रज्ञानावर पकड असेल तर काम सुकर होते. कामाप्रती आपली निष्ठा राखण्यासाठी व वाढवण्यासाठी आधुनिक जगातील तंत्रज्ञान अवगत करणे काळाची गरज बनली असल्याचे सांगून जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, लोकाभिमुख प्रशासनात सामान्य नागरिकांबरोबरच पर्यावरणाप्रतीही आपले उत्तरदायित्त्व असल्याची भावना प्रत्येकाने मनी बाळगली पाहिजे. त्या अनुषंगाने मेपर्यंत सात बारावर झाडांच्या नोंदी घेण्यात याव्यात. तसेच, कर्मयोगी भारत अंतर्गत प्रत्येकाने प्रशिक्षण पूर्ण करावे. अधिकाधिक प्रशिक्षण पूर्ण करून घेणारे उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांची निवड केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी अनेक टूल्स आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कार्यक्षमतेला चालना मिळते. कमी अवधीत काम पूर्ण होऊन कामाची परिणामकारकता वाढते. डाटा विश्लेषण, डाटा प्रोसेसिंग, वर्गीकरण, शासकीय पत्र नमुना अशा अनेक बाबतीत कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोगी ठरणारी आहे, असे ते म्हणाले.
यावेळी तहसिलदार योगेश टोम्पे व महानगरपालिका सहआयुक्त अश्विनी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी कोमल चौबळ, वरिष्ठ व्यवस्थापक सचिन निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाव्यवस्थापक मोहसिन शेख, लर्निंग एक्सपिरिएन्स आर्किटेक्ट श्रद्धा गोटखिंडीकर, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक विनायक कदम, सहाय्यक व्यवस्थापक अनुपम क्षीरसागर कार्यशाळेस मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा दोन सत्रात घेण्यात आली. महसूल, भूमिअभिलेख आणि अन्य शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार अमोल कुंभार व चिटणीस शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. तहसिलदार लिना खरात यांनी आभार मानले.
०००